वेतन नसल्याने ST कर्मचारी अत्यंत हवालदील; काहीजणांवर मोलमजुरीची वेळ तर आर्थिक तणावातून आत्महत्येच्याही घटना...

वेतन नसल्याने ST कर्मचारी अत्यंत हवालदील; काहीजणांवर मोलमजुरीची वेळ तर आर्थिक तणावातून आत्महत्येच्याही घटना...

मुंबई ः  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून एसटीचे चाक थांबलेले आहे. त्यामुळे महामंडळाला रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पुर्ण वेतन मिळत नसल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामूळे अनेक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर मोलमजूरी करण्याची वेळ आली असून काहिंनी इतर व्यवसायाकडे वळण्याचा पर्याय निवडला आहे. तर, दिवसेंदिवस तग धरणे कठिण होत असल्याने काहींनी आर्थिक तणावातून आत्महत्येचे पाऊलही उचलले आहे. 

एसटी सेवेला ब्रेक लागल्याने महामंडळाचे रोज 22 कोटींचे उत्पन्न बुडत आहे. अशात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुद्धा एसटीकडे पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांमोर आर्थिक संकंट निर्माण झाले आहे. त्यामूळेच परभणी जिल्ह्यातील पाथरी आगारातील तुकाराम पुंगळे या वाहकाने आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोंजदाराचे काम करण्याचा पर्याय निवडला आहे. तर, एकनाथ लिंगायत या वाहकाने भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सिल्लाड आगारातील वाहकाने पाणीपूरीचा व्यवसाय सुरू केले आहे. तर, सांगलीच्या इस्लामपूर आगारातील मेकॅनिकल विभागातील अमोल माळी यांनी नुकतेच गळफास लावून आत्महत्या केली आहे.  त्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोलमजूरीची वेळ आली आहे. अमोल यांच्या सारखे अनेक एसटी कर्मचारी सध्या आर्थिक संकंटात सापडले असल्याने, मार्च महिन्यापासून उर्वरीत वेतनासह जुलै महिन्यांचे सुद्धा पुर्ण वेतन देण्याची मागणी एसटी कर्मचारी संघंटनांकडून केली जात आहे. 

वेतन नसल्याने कर्मचारी अत्यंत हवालदील झाला आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शिक्षणाचीही चिंता आहे. आम्ही आजच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांनाही निवदने दिले आहे. तातडीने वेतन होणे आवश्यक आहे.
- संदिप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघंटना
----------------------
एसटीचे काही कर्मचारी उपजीविका भागवण्यासाठी मोलमजुरी करीत आहेत. ही शोकांतिका आहे. शासनाने अर्थसहाय्य दिल्याशिवाय वेतन होणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ  अर्थसहाय्य द्यावे. अन्यथा असंतोष उफाळून येईल 
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
--------------------
लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांना ऑनड्यूटी समजून वेतन दिले जाईल, असे परिपत्रक सरकारने काढले असूनही वेतन दिले जात नाही. तब्बल अडीच महिने वेतन मिळालेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना इतरांच्या तुलनेत वेतन अगोदरच कमी मिळते. त्यामुळे कर्मचारी अन्य व्यवसायाकडे वळले आहेत़. कामगार, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेस

 

गणेशोत्सवापूर्वी वेतनाचा तिढा सुटणार?
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यानूसार, गणेशोत्सवापुर्वीच कामगारांना त्यांच्या उर्वरीत वेतनासह जुलै महिन्याचे पुर्ण वेतन देण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात येत्या काही दिवसांतच बैठक होणार आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाईल, असे एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटिवर सांगितले आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com