एसटी कामगार राज्यभर आंदोलन करणार; प्रवीण दरेकर यांचा इशारा

कृष्ण जोशी
Friday, 18 September 2020

आठ दिवसांत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले नाहीत, तर भाजपच्या वतीने राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज दिला. 

मुंबई: आठ दिवसांत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले नाहीत, तर भाजपच्या वतीने राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज दिला. 

एसटी कर्मचा-यांच्या थकीत पगाराचा प्रश्न व अन्य प्रलंबित मागण्यांविषयी दरेकर यांनी आज एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली. एसटी च्या  तिजोरीत खडखडाट असला तरी गेले दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने माणुसकीच्या दृष्टीकोनातून या प्रश्नाकडे पहावे, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.  

''ईज ऑफ डुईंग बिजनेस' अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एसटी चे उत्पन्न शंभर कोटी रुपये असून कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी तीनशे कोटी रुपयांचे देणे असल्याचे चन्ने यांनी सांगितले. मात्र कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे घर आता पगाराशिवाय कसे चालत असेल अशा संवेदनशीलतेतून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. परिवहनमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना तीनशे रुपयांचा भत्ता जाहीर करूनही तो अद्याप मिळाला नाही. कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचा विमा देण्याची घोषणा झाली होती, त्याचीही अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप करून, आतापर्यंत मरण पावलेल्या 43 एसटी कर्मचाऱ्यांना तत्काळ हे विमा कवच द्यावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
 एसटी ही राज्याची जीवनवाहिनी असल्याने तिच्या कर्मचाऱ्यांकडे शासनाने विशेष लक्ष दिलेच पाहिजे. आम्ही शासनाकडे एसटीसाठी दोन हजार कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली आहे. शासनाने त्यातील एक हजार कोटी रुपये जरी दिले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्यांच्या पगाराचा विषय मार्गी लागेल. पण शासनाने याबाबत त्वरेने निर्णय न घेतल्यास आंदोलन करू, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

'महाराष्ट्राच्या मायभगिनींचा अवमान सहन करणार नाही'! काँग्रेसनेते सचिन सावंत

पत्रकारांकडेही दुर्लक्ष 
एसटी कर्मचार्यांप्रमाणेच पत्रकारांच्या बाबतीतही सरकारने  संवेदनहीनता दाखवली आहे. पत्रकारांनाही अद्याप विमा कवच मिळाले नाही, याकडेही प्रवीण दरेकर यांनी लक्ष वेधले. 

 

एसटी कर्मचाऱ्यांना गेले दोन महिने (जुलै व ऑगस्ट) वेतन मिळाले नाही. मुळातच या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा खर्च चालवणे कठीण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने आर्थिक मदत करावी.
 - श्रीरंग बरगे,
सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST workers will agitate across the state Praveen Darekars warning