मुंबईतील नागरिकांवरील मोठं संकट टळलं; यंदा पाणीपट्टीत वाढ नाही

समीर सुर्वे
Friday, 30 October 2020

महापालिका 1 लाख 2 हजार 332 ग्राहकांना रोज 3800 दशलक्ष लिटर पाणी पुरवते.

मुंबई : पाणीपट्टीत दुप्पट वाढ होण्याचे मुंबईतील नागरीकांवरील  संकट टळले आहे. पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव सर्व पक्षीय सदस्यांनी स्थायी समितीत फेटाळून लावला आहे. कोविडमुळे आर्थिक दृष्ट्या खंगलेल्या करदात्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

महानगरपालिकेने 2012 मध्ये अर्थसंकल्पात दरवर्षी पाणीपट्टीत 8 टक्क्यापर्यंत वाढ करण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार पालिका प्रशासन दरवर्षी महासभेच्या मंजूरीने 8 टक्के वाढ लागू करते. मात्र, यंदा झोपडपट्टी वगळता सर्व ग्राहकांच्या पाणीपट्टीत 100 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकित प्रशासनाने मांडला होता. या प्रस्तावावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आक्षेप घेतला. तर, विरोधीपक्षनेते रवी राजा यांनीही हा प्रस्ताव फेटाळून लावण्याची उपसूचना मांडत ही वाढ अन्यायकारक आहे. पालिका आजही अनेक भागात पुरसे पाणी देऊ शकत नाही मग 100 टक्के वाढ कशी करता असे नमुद केले.

महत्त्वाची बातमी : फेक टीआरपी प्रकरण: 'फक्त मराठी' चॅनलच्या मालकाला जामीन मंजूर

या उपसूचनेला सर्व पक्षिय सदस्यांनी पाठिंबा दिला. एकमताने अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव फेटाळला. सध्या, कोरोनाचा प्रादुर्भाव असताना पाणी दरवाढ लादणे अन्यायकारक असल्याचे मत भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केले. पाणी दरवाढीच्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने सर्वपक्षीय गटनेते, स्थायी समिती अध्यक्षांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, असे मत व्यक्त करीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला.

पुरवठा (लिटरमध्ये)  सध्याचे दर -- प्रस्तावित दर

  • 150 ते 200 --10.44 -- 20.88
  • 200 ते 250 --15.66 -- 26.10
  • 250 पेक्षा जास्त -- 20.88 --31.32 

खर्चाच्या निम्मी वसूली 

महापालिका 1 लाख 2 हजार 332 ग्राहकांना रोज 3800 दशलक्ष लिटर पाणी पुरवते. प्रत्येक हजार लिटर पाणी शुध्द करुन ते घरापर्यंत पोहचविण्यासाठी पालिकेला 19 रुपये 44 पैसे खर्च होतो. तर पाणीपट्टीतून 10 रुपयेे 44 पैसे वसुली होते, अशी माहिती प्रस्तावात नमुद करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : रहिवाशांना दिलासा, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खातं उघडणे बंधनकारक

झोपडपट्ट्या तसेच 2013 नंतर उभ्या राहीलेल्या इमारतींनामध्ये पालिका डरडोई 90 लिटर या प्रमाणे प्रत्येक घरातील पाच माणसांसाठी पाणी पुरवते. तर, दरडोई 150 लिटरपर्यंत पुरवल्या जाणाऱ्या पाणीपट्टीत कोणताही बदल करण्यात येणार नव्हता. तर ताबा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना पालिकांना पुर्वीपासून दुप्पट दराने पाणी पुरवते. त्यामुळे दरडोई 150 लिटरपेक्षा जास्त पाणी मिळणाऱ्या ओसी नसणाऱ्या इमारतींची पाणीपट्टी 20 रुपये 90 पैशांवरुन 41 रुपये 80 पैशांवर जाणार होती.

standing committee dismissed proposal of increasing water charges in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: standing committee dismissed proposal of increasing water charges in mumbai