esakal | लस घेतलेल्यांना लोकल सेवा सुरु करा; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Raj and Uddhav thackeray

मुंबईकरांच्या जीवनात लोकल सेवा खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पण, कोरोना काळात लोकांच्या लोकल प्रवासावर बंधणे आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत

लस घेतलेल्यांना लोकल सेवा सुरु करा; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- मुंबईकरांच्या जीवनात लोकल सेवा खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पण, कोरोना काळात लोकांच्या लोकल प्रवासावर बंधणे आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिली आहे. कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची सेवा घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रामध्ये केली आहे. त्यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Start a local service for those taking vaccine two doses Raj Thackeray letter to the Chief Minister uddhav thackeray)

राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणालेत की, ''मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे.'' मुंबईकरांच्या जीवनात लोकलचे विशेष महत्व आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री सर्वसामान्यांना दिलासा देतात का हे पाहावं लागेल. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे.

राज ठाकरे म्हणाले की, गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत.

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालय सुरु आहेत. सर्वांना धरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे 'बस सुरु आणि लोकल बंद ह्यानं नेमकं काय साध्य होणार?

ही साथ एकाएकी जाणार नाही असं जगातल्या तज्ञांचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथींबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे, आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही.

हेही वाचा: National Mango Day : आंबा भारत अन् पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची स करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल.

त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो आहे की मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीनं सुरु केली जावी. विविध प्रकारच्या मोहीमा हातात घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील, आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल.मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार ह्या सगळ्याचा विचार करून त्वरित पावलं उचलेल

loading image