राज्याला ५० हजार युनिट रक्ताची गरज 

राज्याला ५० हजार युनिट रक्ताची गरज 

मुंबई - उन्हाळी सुटीची सुरुवात झाल्यानंतर राज्यभरात रक्ताचा तुटवडा सुरू झाला आहे. राज्यात रक्ताचा ५० हजार युनिटस्‌; तर मुंबईत आठ ते १० हजार युनिटस्‌ इतका तुटवडा आहे. त्यामुळे सामाजिक संस्था आणि रक्तपेढ्यांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरे घ्यावीत, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे. चित्रपटगृहांतही रक्तदानाचे आवाहन करणाऱ्या जाहिराती दाखवण्यात येणार आहेत.

रक्तदान शिबिरे घेण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. आता उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यामुळे रक्तदान शिबिरे कमी झाली आहेत. परिणामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच रक्ताची टंचाई जाणवू लागली आहे. राज्यात दर महिन्यात रक्ताची दीड लाख युनिटस्‌ राखीव ठेवलेली असतात. परंतु, मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात फक्त एक लाख युनिट रक्तसाठा आहे. मुंबईत २५ हजार युनिट रक्त राखून ठेवलेले असते. हे प्रमाण सध्या १५ हजार युनिट एवढेच आहे.

तुटवडा असल्यामुळे राखीव साठ्यातील रक्त प्रामुख्याने अपघातग्रस्तांसाठी वापरले जात आहे. रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील आणि तातडीने शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना एक युनिट रक्त दिल्यासही, त्या बदल्यात त्यांच्या नातेवाइकांना रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. 

रक्त संक्रमण परिषदेने मागील रविवारी (ता. ५) वेगवेगळ्या रक्तपेढ्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी रक्‍तदान शिबिरे घेऊन साठा वाढवण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात आले.

संस्था-संघटना, मंदिरांना साकडे 
राज्य रक्त संक्रमण परिषदेने सामाजिक संघटना, रक्तपेढ्या, तसेच खासगी संस्था व मंदिरांच्या प्रशासनांना रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील काही धार्मिक संस्था दर वर्षी रक्तदान शिबिरे घेतात. त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो. सध्याचा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन त्यांना हे आवाहन करण्यात आले आहे.

बॅंका, कंपन्यांकडे निधीची मागणी
उन्हाळ्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद जाहिरातींद्वारे जनजागृती करणार आहे. ‘सीएसआर’ निधीतून ही योजना राबवली जाईल. चित्रपटगृहांत दाखवल्या जाणाऱ्या या जाहिरातीसाठी किमान २० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. चित्रपट सुरू होण्यापूर्वी मराठी भाषेतील ४० सेकंदांच्या दोन जाहिराती दाखवल्या जातील. या संदर्भात परिषदेने काही बॅंका आणि नामांकित कंपन्यांना प्रस्ताव पाठवल्याची माहिती देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com