परवानगी मिळाली; आता कोरोना रुग्णांवर होणार आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

भाग्यश्री भुवड
Friday, 2 October 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारकडून विविध टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती.

मुंबई : सौम्य किंवा मध्यम लक्षण असतानाच कोरोना रुग्णांवर या आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी उपचार पद्धतींचा वापर केला तर रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही किंवा भविष्यात होणारा धोका टाळण्यास मदत होईल या कारणाने राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास परवानगी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारकडून विविध टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. या टास्क फोर्समधील विविध शाखेतील तज्ज्ञांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवरील उपचारांविषयी निर्णय घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील आयुष टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचा विचार करुन आता राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंबंधी मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक जाहीर केले आहे.

अजूनही कोरोनावर ठोस उपचार निघालेला नाही. त्यामुळे, कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करु देण्याची मागणी वेगवेगळ्या संघटनांनी सरकारकडे केली होती. त्यानुसार, टास्क फोर्सने सुचवलेल्या मार्गदर्शक सुचनांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

महत्त्वाची बातमी : २०१९ आधीचे कॉल डिटेल्स मिळणं कठीण, NCB च्या तपासात स्पीडब्रेकर येण्याची शक्यता

आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे, या मार्गदर्शक सुचनांनुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करु शकणार आहेत. सेंट्रल काँन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीकडून ही या उपचारांना मान्यता मिळाली आहे. अॅलोपॅथी उपचार प्रक्रिया सुरू असताना या औषधांचीही मदत घेता येईल.

- डॉ. जसवंत पाटील, सदस्य, आयुष टास्क फोर्स

उपचार पद्धतीची विशेष बाब -

या उपचार पद्धतीची विशेष बाब म्हणजे प्रत्येक रग्णाच्या लक्षणांनुसार यात औषधांचा समावेश आहे. सौम्य आणि मध्यम लक्षणे असतानाच कोरोना रुग्णांवर या उपचार पद्धतींचा अवलंब केल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही किंवा भविष्यात जीवाला निर्माण होणारा धोका टाळण्यास ही मदत होणार आहे. 

दरम्यान, या बातमीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ही दुजोरा दिला असून रुग्णांची परवानगी असल्यास डाॅक्टरांना हे उपचार करता येतील असेही त्यांनी सांगितले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

state gave permission to give ayurvedic unani treatment to covid patients with mild symptoms


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state gave permission to give ayurvedic unani treatment to covid patients with mild symptoms