
साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमकी कसा साजरा करायचा, याबाबत कालच्या बैठकीत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही .
बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच..
मुंबई:अनेक दिवासांपासून प्रतिक्षेत असलेला गणेशोत्सवबाबत निर्णय काल राज्य सरकारने जाहीर केला. गणेशोत्सव मिरवणुकाविना व साधेपणाने साजरा करण्यात येणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. परंतु साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमकी कसा साजरा करायचा, याबाबत कालच्या बैठकीत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही .
गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तींचे विसर्जन नियोजन कसे असणार, मंडळासाठीची नियमावली याबद्दल काल झालेल्या बैठकीत कोणतीच ठोस माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार व भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवाला दीड महिना शिल्लक आहे. गणेश मूर्तीकारांना अजूनपर्यंत मूर्ती घडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मंडपासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे लॉकडाऊनमुळे आधीच उशीर झाल्याने गणेश मूर्तींची मागणी कशी पूर्ण करायची या चिंतेत मूर्तिकार आहे. पालिकेने अर्ज खुले केले तरी मंडप परवानगीसाठी पोलिस , वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र लागते. पोलिसांकडून परवानगी दिली जात नाही.
नागरिकांकडून 80 टक्के मागणी ही शाडूच्या मूर्तींना आहे. अशा परिस्थितीत मूर्तीची मागणी पूर्ण करण्यासाठी काही जागा भाड्याने घेऊन मूर्तिकार मूर्ती घडवण्याचे काम करत आहे. यामुळे मूर्तिकारांवर आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारने मूर्तिकारांचा जागेचा प्रश्न त्वरित सोडवणे गरजेचे आहे, गणेश मूर्ती असतील तर गणेशोत्सव होईल, असे मत श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष वसंत राजे यांनी मांडले.
मुंबईतील अनेक मंडळांनी कोरोना संकट लक्षात घेऊन गणेश मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईत अजूनही काही मंडळ राज्य सराकरच्या उंची बाबतच्या निर्देशाच्या प्रतिक्षेत आहे. गणेश मूर्तीचे आगमन व विसर्जन साधेपणाने म्हणजे नेमकी कसे होणार , कृत्रिम तलावाची सोय कशी करणार, तिथे सामाजिक अंतर राखणे याबद्दल अजून कोणतेही माहिती उपलब्ध झाली नाही.
अनेक मंडळांनी मंडपातच मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला परंतु ज्या मंडळांना तशी सोय करणे शक्य नाही त्यांना नियमावली तसेच सामान्य नागरिकांसाठी विभागावर कशी सुविधा असणार या सर्व निर्णयाच्या प्रतिक्षेत सामान्य नागरिक आणि मंडळ आहेत. याबाबत सरकारने लवकरात लवकर नियमावली जाहीर करावी अशी मागणी मूर्तिकार, मंडळ व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
लवकरच राज्य सरकारकडून नियमावली व सूचना स्पष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ व म मूर्तिकारांना मंडप परवानगी सद्यस्थितीत देण्यात येऊ नये, असे निर्देश मुंबई पालिकेच्या परिपत्रकात देण्यात आले आहेत.
"या बैठकीत मुख्यमंत्री उंचीच्या निर्बंधाबाबत निर्णय देतील अशी अपेक्षा होती. मात्र त्याबाबत अजून निर्णय झाला नाही. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना व नियमावली जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत आहोत", असे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी म्हंटले आहे.
'याबाबत अजूनही स्पष्ट निर्देश दिले नाही. त्यामुळे मंडळ आणि आम्ही संभ्रमात पडलो आहे", असे श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष वसंत राजे यांनी म्हंटले आहे.
state government has not clear all doubts regarding ganesh festival