राज्य सरकारकडूनच 'गणपती विशेष' रेल्वेगाड्यांची रखडपट्टी; मध्य रेल्वेनेचे दिले स्पष्टीकरण

प्रशांत कांबळे
Thursday, 13 August 2020

राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी 8 ऑगस्टला दूरध्वनीवरून विशेष गाड्यांच्या चालविण्याचे वेळापत्रक थांबून ठेवण्यास सांगितले.

मुंबई : कोकणातील रेल्वे प्रवासी संघटनांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली होती. त्यावरून राज्य सरकारने सुद्धा या गाड्या चालवण्यात काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले, मात्र मध्य रेल्वेने तयार केलेल्या नियोजनाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने मात्र सध्या कोकण रेल्वे मार्गावर गणपती विशेष रेल्वेचे वेळापत्रक स्थगित ठेवण्याच्या सूचना मध्य रेल्वेला केल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. 

दादर, माहीममध्ये 'या' ठिकाणी होणार कृत्रिम तलावांची निर्मिती; मनसेच्या पाठपुराव्याला यश

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर 23 जुलै रोजी मध्य रेल्वेने राज्य सरकारला पत्र पाठवून कोकणात जाणाऱ्या गणपती विशेष गाड्या चालवण्याविषयी मार्गदर्शन मागितले होते. यामध्ये विशेष गाड्या कशा चालवायच्या, त्यांची संख्या आणि तारीख याबाबत माहिती विचारण्यात आले होती. दरम्यान राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या संचालकांनी 7 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेला पत्र पाठवून गणपती महोत्सवासाठी कोकणात विशेष गाड्या नियोजित केल्या जाऊ शकतात, असे कळवले.  त्यानुसार मध्य रेल्वेने त्वरित विशेष गाड्यांचे वेळापत्रक तयार करून रेल्वे बोर्डाकडे मान्यतेसाठी पाठविले होते.

वसई - विरारमध्येही गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी महापालिकेने ठरवली ही नियामावली; जाणून घ्या सविस्तर

त्यानंतर रेल्वे बोर्डाने गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या आंतरजिल्हा प्रवासाच्या नियमाच्या अंतर्गत 9 ऑगस्टला या विशेष गाड्या चालवण्यास तत्काळ मान्यता दिली. सोशल डिस्टन्सिंग आणि खबरदारीच्या सर्व नियमांच्या अधीन राहून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यास रेल्वे तयार होते. मात्र, राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी 8 ऑगस्टला दूरध्वनीवरून विशेष गाड्यांच्या चालविण्याचे वेळापत्रक थांबून ठेवण्यास सांगितले. त्यासोबतच कोकणात गणपतीसाठी विशेष रेल्वे चालवण्यावर राज्य सरकार विचाराधीन असून त्याच्या विषयी लवकरच  सल्ला दिला जाईल, असेही राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेला सांगितले. 

जबरदस्त! धारावीत ऑगस्ट महिन्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

त्यामुळे कोकणातील गणपतीसाठी चालवण्यात येणारी विशेष रेल्वेची सेवा अद्याप सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिले.  त्यासह राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मध्य रेल्वे वेळोवेळी पाठपुरावा करत असून राज्य सरकारने परवानगी दिल्याबरोबर कोकणातील गणपती उत्सवासाठी विशेष रेल्वे चालविण्यास येणार असल्याचेही मध्य रेल्वेने सांगितले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state govt still not given permission to ganpati special trains in konkan