यंदाच्या गणेशोत्सवाची सर्वात मोठी बातमी..'या' गोष्टीवर घालण्यात आली बंदी..जाणून घ्या महत्वाची माहिती ..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर बंदी घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक घटकांनी मूर्ती बनवाव्यात; रासायनिक रंगांचा वापर करू नये, अशा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

मुंबई:  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर बंदी घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक घटकांनी मूर्ती बनवाव्यात; रासायनिक रंगांचा वापर करू नये, अशा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, त्यांची अंमलबजावणी या वर्षापासूनच होणार आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे; त्यामुळे कोरोनामुळे आधीच त्रस्त असलेल्या मूर्तीकारांच्या समस्येमध्ये आणखी भर पडली आहे. 

हेही वाचा: 'या' काही शेअर्समध्ये उद्धव ठाकरे यांनी गुंतवले आहेत आपले पैसे..

गणेशोत्सवाला केवळ १०० दिवस राहिले असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे मूर्तिकरांपुढे नवीन आव्हान उभे राहिले आहे. एवढ्या कमी दिवसांत मातीच्या मूर्ती कशा तयार करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे मूर्तिकारांना पीओपी आणि शाडूची माती मिळत नाही. शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी अधिक जागा आवश्यक असते; तसेच या मूर्ती सुकण्यासाठी जास्त वेळ लागतो, असे मूर्तिकारांनी सांगितले. राज्य सरकारने मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मूर्तिकार करत आहेत. 

आम्ही केवळ घरगुती गणपती बनवण्याचे काम सुरू केले असून, अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती तयार करत आहोत. मुंबईतील गणपतीच्या मूर्तींची मागणी केवळ ६० टक्के पूर्ण होऊ शकते. मातीच्या मूर्ती बनवायला वेळ लागतो; उर्वरित ४० टक्के मूर्ती कशा घडवायच्या, असा सवाल बृहन्मुंबई मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी केला. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मूर्ती बनवण्याचे काम नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरू झाले. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करून पीओपीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. पीओपीवर आता बंदी आल्यास मोठे नुकसान सहन करावे लागेल. म्हणून राज्य सरकारने पीओपीवरील बंदीची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करावी, अशी मागणी राज्य मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष वसंत राजे यांनी केली आहे.   

मोठी बातमी: वर्सोवा, जुहू गावांसह सात वस्त्या होणार टोटल सील..आता अंधेरी पॅटर्न 

 हे आहेत नियमावलीतले महत्त्वाचे मुद्दे:
 

पीओपी आणि रासायनिक रंगांचा वापर करण्यावर बंदी.
नैसर्गिक वस्तूंचा वापर करणे बंधनकारक. 
सजावटही पर्यावरणस्नेही असावी, प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी. 
पालन न केल्यास मूर्तिकारांच्या कारखानाचा परवाना किमान दोन वर्षांसाठी रद्द.

दरम्यान ,"गणेशोत्सवाला जेमतेम १०० दिवस उरले आहेत. इतक्या कमी काळात शाडूच्या मूर्तीची निर्मिती करणे अशक्य आहे. लॉकडाऊनमध्ये कच्चा माल मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वर्षापुरती नियमावलीतून सूट द्यावी, अशी विनंती करणार आहे," असं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष  अॅड्. नरेश दहिबावकर यांनीं म्हंटलंय.

हेही वाचा: चिंताजनक! राज्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद; दिवसभरात ५४ रुग्ण दगावले  
 
तर "मुंबईत तरी पीओपीच्या मूर्ती तयार नाहीत; पण पेण-पनवेलमध्ये पीओपीच्या मूर्ती तयार आहेत. त्यामुळे तेथील मूर्तिकारांचे नुकसान होईल. शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी मुबलक जागा आणि माती वर्षभर उपलब्ध करून देणे आणि सबसिडी देणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी केंद्राच्या या निर्णयातून मूर्तिकारांना सूट द्यावी", असं मूर्तिकार रेश्मा खातू यांनी म्हंटलंय. 

state pollution control department banned POP ganesha statue read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state pollution control department banned POP ganesha statue read full story