Ulhasnagar : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुसऱ्यांदा उल्हासनगरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Jayant Patil

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुसऱ्यांदा उल्हासनगरात

उल्हासनगर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष वाढीसाठी उल्हासनगरात दुसऱ्यांदा धाव घेतली आहे. विशेष म्हणजे पाटील यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पंचम कालानी आणि माजी जिल्हाध्यक्ष नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी यांच्याशी समनव्यक साधण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या आहेत.

मागील महिन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे कालानी महालात आले होते. त्यानंतर काही तासांतच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या सोनिया धामी यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र जारी करण्यात आले. त्यापाठोपाठ पंचम कालानी यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी पंचम कालानी यांनी भाजप नगरसेविका पदाचा राजीनामा आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे सोपवला आणि त्याच दिवशी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

ओमी कालानी यांनी त्यांची टीओकेची संपूर्ण टीम राष्ट्रवादीत विलीन केली.या घडामोडींना महिना होण्यापूर्वीच जयंत पाटील यांनी पुन्हा उल्हासनगरात धाव घेतली. राष्ट्रवादी वाढवण्याच्या उद्देशाने किंबहुना रणनीती तयार करण्यासाठी कालानी महाल गाठला. पप्पू कालानी, ओमी कालानी, पंचम कालानी, सीमा कालानी, मनोज लासी, कमलेश निकम, सुमित चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. जर्जर आणि धोकादायक इमारतींबाबत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार असून विकास निधी उपलब्ध करून देण्यात येणार, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

उल्हासनगरात अनेक मुख्य चौकात राष्ट्रवादीच्या एलईडी घड्याळी बसवण्यात येणार असून त्याचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जयंत पाटील यांनी माजी जिल्हाध्यक्ष व नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि धामी यांना सन्मानपूर्वक प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र सोपवले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, निरीक्षक भगवान टावरे, सभागृहनेते भारत गंगोत्री उपस्थित होते.

loading image
go to top