esakal | मास्क घाला! रेल्वेकडून विनामास्क प्रवाशांवर कडक कारवाई

बोलून बातमी शोधा

local train
मास्क घाला! रेल्वेकडून विनामास्क प्रवाशांवर कडक कारवाई
sakal_logo
By
कुलदिप घायवट

मुंबई: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक प्रवासी विना मास्क प्रवास करताना आढळून येत आहेत. भारतीय रेल्वेने देशातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी मास्क घालावा, यासाठी कडक पाऊल उचलले आहे. 17 एप्रिलपासून भारतीय रेल्वेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याद्वारे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने एका आठवड्यात 1 हजार 579 विनामास्क प्रवाशांकडून 3 लाख 32 हजार 950 रुपयांची दंडवसूली केली आहे.

रेल्वे परिसरात किंवा रेल्वेत विनामास्क प्रवासी आढळून आल्यास अथवा कुठेही थुंकण्यामुळे रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरेल. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. कोरोना काळात अस्वच्छता पसरविल्यास कोरोनाचा संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे भारतीय रेल्वेने 17 एप्रिलपासून कडक नियमावली जाहीर करून अंमलबजावणीस सुरूवात केली. रेल्वे परिसर अथवा रेल्वेत असताना विनामास्क सापडल्यास 500 रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसर अथवा रेल्वेत थुंकून परिसर अस्वच्छ केल्यासही 500 रुपये दंड भरावा लागत आहे.

हेही वाचा: हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत लसीकरण थांबलं

मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, मुंबई, सोलापूर, पुणे या पाचही विभागात विभागात 17 ते 25 एप्रिलपर्यंत विनामास्क असलेल्या 878 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 70 हजार 450 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई, बडोदा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर या सहा विभागात 17 ते 25 एप्रिलपर्यत 701 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. याद्वारे एकूण 1 लाख 62 हजार 500 रुपयांची दंडवसूली करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशानाच्यावतीने देण्यात आली. प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझेरचा वापर करून हातांची स्वच्छता, सामायिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, यासाठी जनजागृतीसह रेल्वे प्रवाशांना आवाहन केले जात आहे. मात्र, प्रवाशांकडून या आवाहनाला दुजोरा दिला जात नसल्याने दंडात्मक कारवाई सुरू आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

strict action against unmasked local train passengers by railways