esakal | प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी आजपासून 
sakal

बोलून बातमी शोधा

file

नागरिक, कॉर्पोरेट कार्यालये, मंगल कार्यालयेही रडारवर 

प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी आजपासून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काहीही होत नाही म्हणून प्लास्टिकची पिशवी घेऊन बाजारात जाणार असाल, तर आताच सावध व्हा. महापालिकेच्या विशेष पथकाने पकडल्यास किमान पाच हजार रुपयांचा फटका बसेल. प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी रविवारपासूनच (1 मार्च) सुरू होत आहे. बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई होणार असून; कॉर्पोरेट कार्यालये, मॉल, खासगी आस्थापना आणि मंगल कार्यालयांनाही लक्ष्य केले जाईल, अशी माहिती शनिवारी (ता. 29) महापालिका प्रशासनाने दिली. 

हेही महत्‍वाचे...दाढीमुळे कोरोनाचा धोका?
राज्यात प्लास्टिकबंदी लागू होऊन दोन वर्षे उलटली. एक वेळ वापराच्या काही वस्तू वगळता सर्व प्रकारच्या प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी आहे; परंतु बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर आजही राजरोसपणे होत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून 1 मेपर्यंत राज्य प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे महापालिका रविवारपासून विशेष मोहीम सुरू करणार आहे. 

महापालिका फेरीवाले, दुकानदार, व्यापारी यांच्यावर कारवाई करत होती; मात्र आतापर्यंत नागरिकांवर दंड केला जात नव्हता. फक्त त्यांच्याकडील बंदी घातलेले प्लास्टिक जप्त केले जात होते. रविवारपासून नागरिकांनाही दंड ठोठावला जाणार असून, मंगल कार्यालये आणि खासगी कार्यालयेही रडारवर येणार आहेत. या कारवाईसाठी महापालिकेने यापूर्वीच विशेष पथक तयार केले आहे.

महापालिकेने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर जून 2018 पासून आतापर्यंत 16 लाख 324 आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईत 85 हजार 840 किलोग्रॅम प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. एकूण 668 आस्थापनांना तपासणी अहवाल दिले असून, चार कोटी 64 लाख 30 हजार रुपये दंड वसूल केला आहे. 

हेही महत्‍वाचे...मुंबईत जमावबंदीचे आदेश

विशेष पथक 
महापालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी जून 2018 मध्ये "ब्ली स्क्वॉड' स्थापन करण्यात आले असून, बाजार, अनुज्ञापन आणि दुकाने व आस्थापना खात्यातील 310 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आता 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या कारवाईसाठी प्रभाग कार्यालयांतील अनुज्ञापन, आरोग्य, बाजार, दुकाने व आस्थापना, शिक्षण या विभागांतील अधिकाऱ्यांचेही पथक तयार करण्यात आले आहे. 

जनजागृतीवर भर 
दुकाने व आस्थापना खात्यातर्फे व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. नाट्यगृहांत प्रयोगाच्या सुरुवातीला व मध्यंतरात प्रतिबंधित प्लास्टिक न वापरण्याबाबत प्रेक्षकांना सूचना करण्याबाबत संचालकांना कळवले जाणार आहे. या मोहिमेत ज्येष्ठ नागरिक व निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेतले जाईल. विभाग स्तरावर पथके तयार करून समन्वय अधिकारी नेमण्यात येईल. बेस्ट उपक्रमाच्या वाहनांवरही जनजागृतीपर फलक लावण्यात येतील. 


यांचा वापर नकोच 
- प्लास्टिकच्या कोणत्याही प्रकारच्या पिशव्या. 
- प्लास्टिकच्या एक वेळ वापराच्या वस्तू (ताट, ग्लास, चमचे, उपाहारगृहातील अन्नपदार्थ पॅक करण्याच्या वस्तू) 
- द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे पाऊच व ग्लास. 
- अन्नपदार्थ व धान्य साठवण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे वेष्टन. 

अशा शिक्षा 
- पहिल्या गुन्ह्याबद्दल : पाच हजार रुपये दंड 
- दुसऱ्या गुन्ह्याबद्दल : 10 हजार रुपये दंड 
- तिसऱ्या गुन्ह्याबद्दल : 25 हजार रुपये दंड, तीन महिने कैद 
 

loading image