माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन; अण्णासाहेब पाटील महामंडळ बरखास्त केल्याने तीव्र पडसाद

सुजित गायकवाड
Wednesday, 11 November 2020

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना भाजप सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपद दिले होते. परंतु राज्य सरकारने हे महामंडळ तडकाफडकी बरखास्त केले

नवी मुंबई: माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना भाजप सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपद दिले होते. परंतु राज्य सरकारने हे महामंडळ तडकाफडकी बरखास्त केले. त्याचे पडसाद बुधवारी एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये उमटले. माथाडी कामगारांनी सकाळपासूनच काम बंद आंदोलन केले. त्यामुळे संध्याकाळपर्यंत गाड्यांतील माल जैसे थे होता. 

जामीन मिळाला तरी अर्णब गोस्वामींना होऊ शकते पुन्हा अटक; पोलिसांनी नोंदवले डजनभर गुन्हे

कांदा-बटाटा मार्केट व्यापारासाठी नेहमीप्रमाणे आज सकाळी खुला करण्यात आला. राज्यभरातून कांदा-बटाटा आणि लसूण मालाच्या गाड्याही बाजारात दाखल झाल्या. परंतु काही अवधीतच माथाडी कामगारांनी आंदोलनाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी सरकारविरोधात घोषणा केल्या. सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी मार्केटअंतर्गत रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलनही केले. सरकारने माथाडी कामगारांची फसवणूक केली, अशा आशयाच्या घोषणाबाजी माथाडी कामगार करत होते. माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे बाजारात आलेल्या कांदा-बटाटा शेतमालाच्या वाहनांमधील माल कोणीच खाली उतरवला नाही. दुपार उलटून गेल्यानंतरही मार्केटच्या आवारात पोहोचलेल्या गाड्यांमध्ये माल तसाच पडून होता. अखेर काही कामगार आणि व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन माल खाली उतरवला. परंतु तोपर्यंत बाजारात आलेले ग्राहक माघारी निघून गेल्यामुळे व्यावहार झाला नाही. 
नरेंद्र पाटील यांच्यावर सरकारने केलेला अन्याय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे. 

मृतक एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची मदत; एसटी कामगार सेनेची कुटुंबियांना भावनिक साद

...तर माल खराब होण्याची भीती 
कांदा-बटाटा मार्केट वगळता इतर चारही मार्केटमध्ये व्यवहार सामान्यपणे सुरू होता. सकाळपासून दुपारपर्यंत कांदा-बटाटा मार्केटमध्ये बटाट्याच्या 29, कांद्याच्या 75 आणि लसूनच्या 6 गाड्यांची आवक झाली. परंतु माथाडी कामगारांनी माल खाली उतरू न दिल्यामुळे दिवसभर खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नाही. राज्यभरातून दोन ते तीन दिवस प्रवास करून आलेला माल वाहनात तसाच राहिल्यास खराब होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. 

Strike of Mathadi workers Annasaheb Patil Mahamandal has been dismissal affected in navi mumbai

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strike of Mathadi workers Annasaheb Patil Mahamandal has been dismissal affected in navi mumbai