पालिकेच्या विद्यार्थ्यांचे जेवण सर्वसाधारण सभेत 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 April 2018

जेवणाबाबत काही तक्रारी असल्यास आपण स्वतः या शाळांमधून जाऊन जेवणाची पाहणी करू; तसेच एकदा मुलांसाठी तयार केलेले थोडे जेवण सर्वसाधारण सभेत आपल्यासाठीही मागवू. 

- मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे महापालिका 

ठाणे : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अक्षरपात्र योजनेतून मोफत मध्यान्ह भोजन दिले जाते. हा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित झाल्यानंतर या जेवणाच्या दर्जाबाबत अनेक नगरसेवकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्याची दखल घेऊन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या संस्थेच्या कामकाजाची पाहणी करण्याबरोबरच अचानक सर्वसाधारण सभेत हे जेवण मागवून त्याचा दर्जा तपासला जाईल, असे आश्‍वासन दिले. विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

ठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी अक्षयपात्र या संस्थेला अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री डेव्हीड यांनी या संस्थेमार्फत जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते का, असा प्रश्‍न उपस्थित केला; तर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर म्हणाले की, या संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा चांगला नाही. या जेवणाची एकदा पाहणी करावी, असेही सुचविले. तसेच संजय भोईर यांनी ही संस्था मुलांना मोफत जेवण देणार असल्याचे सांगितले होते, तर या संस्थेला आता अनुदान का दिले जात आहे, असा प्रश्‍न केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बाबाजी पाटील म्हणाले की, यापूर्वी आपण बचत गटांच्या महिलांकडून जेवणाचा पुरवठा करत होतो; पण अक्षयपात्र योजनेतून मोफत जेवणाचा पुरवठा होणार म्हणून आपण त्यांना नाकारले हा प्रकार म्हणजे त्यांच्या पोटावर पाय आणण्यासारखा आहे, असे सांगितले. यावर महापौर मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, संस्थेकडून पुरविल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला आहे. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हे जेवण जेवल्याचे त्यांनी सांगितले. 

संस्थेला देण्यात येणारे अनुदान आपण नाही तर राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. त्यातही पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाणार आहे. त्यापुढील मुलांसाठी पैसे आकारले जाणार आहेत. 

- सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, ठाणे पालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students Food In Thane Corporation Annual General Meeting