'या' नणंद-भावजयीचं होतंय कौतूक...; वाचा का ते...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

अहमदनगरमधील पाथर्डी गावात राहत असणारे एक कुटुंब उदारनिर्वाहासाठी नवी मुंबई दाखल झाले; मात्र घरी बसण्यापेक्षा आपल्या पतीला पाठबळ देण्यासाठी नणंद-भावजयीच्या जोडीने पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई : अहमदनगरमधील पाथर्डी गावात राहत असणारे एक कुटुंब उदारनिर्वाहासाठी नवी मुंबई दाखल झाले; मात्र घरी बसण्यापेक्षा आपल्या पतीला पाठबळ देण्यासाठी नणंद-भावजयीच्या जोडीने पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. वाशी येथील आसाम भवनजवळील सर्कलजवळ या नणंद-भावजय उसाचा गाडा चालवत असून, आपल्या पतीला आर्थिक पाठबळ मिळावे. यासाठी ते हे काम करत असल्याचे सांगतात. 

ही बातमी वाचली का? धावत्या लोकलवर फेकली जातायेत कुत्र्याची पिल्लं

नवी मुंबईतील जुईनगरमध्ये गर्जे कुटुंब राहते. राणी गर्जे व नंदिनी गर्जे यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र, पतीच्या असणाऱ्या तुटपुंज्या पगारात घर चालवणे शक्‍य होत नाही. त्यामुळे या दोन महिलांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी पुढाकार घेतला. मग काय; वाशी येथे या नणंद-भावजय जोडीने उसाचा गाडा उभा केला. त्या सकाळपासून-संध्याकाळपर्यंत गाड्यात ऊस टाकून, थंडगार रसाच्या गोडीने नागरिकांना तृप्त करतात. नगरमधील दुष्काळी परिस्थितीला कंटाळून मुंबईमध्ये येऊन, हे कुटुंब स्थायिक झाले आहे. मात्र, येथील महागाईमुळे घर चालवणे त्यांच्यासाठी जिकिरीचे होत आहे. जुईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत असून, त्यांचे पती हे वाहनचालक आहेत. गावी सासू-सासरे राहत असल्यामुळे या महिलांना त्यांच्याकडे देखील लक्ष द्यावे लागते. त्यांना महिन्याकाठी पैसे पाठवावे लागतात, असे त्या सांगतात.

ही बातमी वाचली का? संडे हो मंडे रोज खा... 'कांदे'; झालेत स्वस्त...​

नागरिकांकडून कौतुक 
पावसाळा सुरू झाल्यानंतर या महिला उसाचा गाडा बंद करून, गावी असणारी शेतजमीन कसतात; तर त्यानंतर पुन्हा मुंबईत येऊन पतीला हातभार लावण्यासाठी उसाचा गाडा चालवून उदारनिर्वाह करतात. या दोघींचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. महिला सर्वच क्षेत्रामध्ये कार्यरत होत असताना, पुरुषांच्या असणाऱ्या छोट्या-मोठ्या कामात देखील महिलांनी आघाडी घेतली आहे. हे काम करताना त्या कोणतीही लाज बाळगत नसल्याने, त्यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sugarcane carts run by Nanand-Bhavajay in vashi