

दिग्गज टेक कंपनी ‘गुगल'ला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) गुगलला ठोठावलेल्या १३३८ कोटी रुपयांच्या दंडाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.
नवी दिल्ली - दिग्गज टेक कंपनी ‘गुगल'ला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) गुगलला ठोठावलेल्या १३३८ कोटी रुपयांच्या दंडाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. मात्र, न्यायालयाने सीसीआयच्या आदेशाचे पालन करण्यासाठी गुगलला आणखी एका आठवड्याने मुदत वाढवून दिली आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी एस नरसिम्हा आणि न्या जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर या मुद्द्यावर सुनावणी झाली. ‘तुम्ही जी प्रणाली युरोपमध्ये लागू केली आहे तीच प्रणाली भारतात लागू करण्यास तुम्ही तयार आहात का?‘ असे न्यायालयाने मागच्या सुनावणीत गुगलला विचारले होते.
हे प्रकरण पुन्हा राष्ट्रीय कायदा अपील न्यायाधिकरणाकडे (एनसीएलएटी) पाठवण्यात आले आहे. सीसीआयच्या निर्णयाविरोधातील अपील ३१ मार्चपर्यंत निकाली काढण्यासही न्यायालयाने एनसीएलएटीला सांगितले आहे.
गुगलने युरोप आणि भारतासाठी वेगवेगळे धोरण स्वीकारल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. युरोपमध्ये अशाच एका प्रकरणात गुगलने ४ अब्ज युरोचा दंड भरला आहे. भारतात मात्र दंडाच्या निर्णयाला या कंपनीने आव्हान दिले आहे. न्या. चंद्रचूड यांनी, गुगलला दंड करण्याचा संबंधित आदेश 20 ऑक्टोबर 2022 रोजी काढण्यात आला होता असे नमूद करून या कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
गुगलने आपल्याला दंड करण्याच्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुगलची ची उपकंपनी असलेल्या ॲंड्रॉईड.आयएनसी या उपकंपनीवर वर (भारतीय) बाजारातील वर्चस्वाचा अवाजवी फायदा घेतल्याबद्दल १३३८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने १६ जानेवारी रोजी गुगलच्या अपीलवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली. गुगलला दंडाच्या रकमेच्या १० टक्के रक्कम १९ जानेवारीपर्यंत जमा करण्यास बजावतानाच सीसीआयने दंडाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. गुगलने एनसीएलटीच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
न्यायालयाने गुगलला सांगितले की डिसेंबरमध्ये अपील दाखल करण्यात आले. तुम्ही आदेशाविरुद्ध अपील दाखल करू शकता. तुम्ही अशी ‘आणीबाणी‘ परिस्थिती निर्माण करत आहात की एनसीएलएटीआयला दंड भरण्यासाठीची तारीख वाढवणे भाग पडले आहे असेही न्ययालयाने फटकारले होते.
गुगलच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी हे (म्हणणे) योग्य नसल्याचे म्हटले आहे. दंडाच्यारकमेचा भरणा करण्याची तारीख १९ जानेवारी अशी निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.