सुशांत सिंह केस : "महाराष्ट्राच्या बदनामीचा मोदी सरकारचा कट, सूत्रधारांच्या अटकेसाठी SIT नेमा" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंह केस : "महाराष्ट्राच्या बदनामीचा मोदी सरकारचा कट, सूत्रधारांच्या अटकेसाठी SIT नेमा"

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे.

सुशांत सिंह केस : "महाराष्ट्राच्या बदनामीचा मोदी सरकारचा कट, सूत्रधारांच्या अटकेसाठी SIT नेमा"

मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या सूत्रधारांबरोबरच तो कट  रचणाऱ्यांनाही ताब्यात घ्यावे, अशी मागणीही त्यांनी ट्वीट द्वारे केली आहे. भाजप नेत्यांनीही महाराष्ट्राची बदनामी करण्यात वाटा उचलला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

सुशांतसिंह याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केल्याच्या एम्स च्या अहवालामुळे या प्रकरणातील मुंबई पोलिसांचा तपास योग्य  दिशेने सुरु होता हे सिद्ध झाले आहे.  या प्रकरणाचा फायदा घेऊन बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट मोदी सरकारने रचला होता. हे हत्येचेच प्रकरण आहे, अशी खोटी वृत्ते कालपर्यंत प्रसारमाध्यमांमध्ये पेरली जात होती. भाजपचे नेते महाराष्ट्राची बदनामी करीत होते, सीबीआय व अन्य तपासयंत्रणाही दिशाभूल करणारी चुकीची माहिती मुद्दाम पसरवीत होत्या. भाजपच्या आयटी सेल ने एका रात्रीत हजारो खोट्या ट्वीट तसेच फेसबुक व यू ट्यूब पोस्ट पसरवल्या होत्या, असेही सावंत यांनी म्हटले आहे. 

महत्त्वाची बातमी : सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सने CBI कडे पाठवला अहवाल

अशा प्रकारे या सर्वांनी महाराष्ट्राची बदनामी करण्यास हातभार लावला होता. आता या कटाचे सर्व कर्तेकरविते, सूत्रधार व तो रचणारे मुख्य या सर्वांचा छडा लावण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक नियुक्त करावे. भाजप च्या आयटी सेल ने यासंदर्भात पसरवलेल्या बोगस मेसेज चा छडा लावून त्यामागे कोण होते, याचाही तपास करण्यात यावा. बोगस वृत्तवाहिन्यांच्या खोट्या बातम्या या देशासाठी धोकादायक असल्याने या वाहिन्यांविरुद्धही कारवाई व्हावी. तरच आपली लोकशाही ताठ मानेने उभी राहील, अशीही मागणी सावंत यांनी केली आहे.

sushant singh case congress sachin sawant demands SIT to investigate conspiracy against state

टॅग्स :BjpCongress