सुशांत सिंह आत्महत्या: भाजपनं राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 17 June 2020

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडं सोपवावा, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्य सरकारकडं केली आहे.

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड जगाला हादरवलं. या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. सुशांतला नैराश्यानं ग्रासलं होतं आणि त्यामुळंच त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येतंय. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडं सोपवावा, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्य सरकारकडं केली आहे.

ऑनलाइन शिक्षणामुळे यंदा टॅब, सेकंडहॅन्ड मोबाइलला सुगीचे दिवस

सुशांतच्या कुटुंबालाच महाराष्ट्र पोलिसांकडून तपास नको असेल तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात सरकारला काय अडचण आहे, असा सवालही राम कदम यांनी उपस्थित केला आहे. राम कदम यांनी एक ट्विट करुन याबाबतची मागणी केली आहे. 

सुशांत आत्महत्येच्या प्रकरणात अनेक नावं पुढं येत आहेत. देशभर चर्चा सुरू आहे. अनेक शहरांशी या प्रकरणाचा संबंध असू शकतो. शिवाय, महाराष्ट्र पोलिसावर आणि महाविकास आघाडी सरकारवर आमचा विश्वास नाही असं त्याचं कुटुंबच म्हणत असेल तर मग या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं द्यायला काय हरकत आहे. महाराष्ट्र सरकारनं याबाबत निर्णय घ्यायला हवा,' असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

गृहमंत्र्यांनी घेतली दखल 

सुशांतच्या आत्महत्येने काही प्रश्नही उपस्थित केलेत. काहींनी सुशांतच्या आत्महत्येचं मुळं कारण हे बॉलिवूडमधील घराणेशाही हे असल्याचा आरोप केला आहे. यामुळेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतच्या आत्महत्या संबंधित मुंबई पोलिस चौकशी करतील असं सांगितलं आहे. खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? की काही कारणांमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केली का? याची चौकशी केली जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, काही प्रसारमाध्यमांनी सिनेसृष्टीतील व्यावसायिक स्पर्धेमुळे जाऊन त्याने आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस त्यादृष्टीनेदेखील चौकशी करतील, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट देखील केलंय.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथे त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या अचानक अशा जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये काम करणार्‍या अनेकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ तिनं बॉलिवूडमध्ये प्रस्थापितांचं असलेलं वर्चस्व सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh commits suicide: BJP made 'this' demand to the state government