फौजदारी फिर्याद रद्द करण्यासाठी सुशांतच्या बहिणी मुंबई उच्च न्यायालयात

सुनीता महामुणकर
Tuesday, 6 October 2020

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेली फौजदारी फिर्याद रद्द करण्यासाठी आता अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई:  बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेली फौजदारी फिर्याद रद्द करण्यासाठी आता अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वैद्यकीय तपासणी शिवाय सुशांतला बंदी घातलेले औषध बहिणी देत होत्या, अशी फिर्याद रियाने केली आहे.

वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांतची गर्लफ्रेंड असलेल्या रियाने त्याची बहिण प्रियंका आणि मितू सिंह विरोधात तक्रार नोंदविली आहे. रिया सध्या कारागृहात असून एनसीबी याप्रकरणी अंमलीपदार्थांचा वापराबाबत तपास करीत आहे. रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून हे उघड झाले आहे की प्रियांकाने दिल्लीतील डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून सुशांतसाठी औषधे घेतली होती. ही औषधे एनडीपीएस कायद्यानुसार प्रतिबंधित आहेत. सुशांतच्या मृत्युसाठी ही औषधे कारणीभूत ठरल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तसेच यासाठी वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही, असेही रियाचे म्हणणे आहे.

अधिक वाचाः  मुंबईत रेस्टॉरंट्स सुरू; पण मद्यविक्रीसाठी वेळ काय?

या तक्रारीमध्ये प्रियांका आणि मितूविरोधात आरोप केले आहेत. त्यामुळे तक्रार रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्हाला नाहक गुंतविले आहे, असा दावा दोघांनी केला आहे. याचिकेवर न्या एस एस शिंदे यांच्या खंडपीठापुढे आज होण्याची शक्यता आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्येने झाला असून सीबीआय या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

अधिक वाचाः  सिव्हिल इंजिनिअर मारहाण प्रकरण, आव्हाडांच्या तीन अंगरक्षक पोलिसांना अटक

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Sushant Singh Rajput sister in Mumbai High Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput sister in Mumbai High Court