सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणः बॉलिवूडमधील 18 संशयितांची यादी तयार, NCB अधिकारी दिल्लीला रवाना

अनिश पाटील
Saturday, 12 September 2020

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केल्यानंतर तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक महितीचा खुलासा झाला आहे. त्या अनुशंगाने एनसीबीने 18 जणांची यादी तयार केली आहे.

मुंबई: सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केल्यानंतर तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक महितीचा खुलासा झाला आहे. त्या अनुशंगाने एनसीबीने 18 जणांची यादी तयार केली आहे. या सर्वाना चौकशीचे समन्स पाठविण्यासाठी एनसीबी अधिकारी के.पी. एस मल्होत्रा हे दिल्लीला रवाना झालेत. या ठिकाणी एनसीबी संचालक राकेश अस्थाना यांच्याशी चर्चा करीत निर्णय घेणार असल्याची माहिती एनसीबी सुत्रांनी दिली.

एनसीबीने तयार केलेल्या 18 जणांच्या यादीमध्ये बॉलिवूडसह काही उद्योजकांचा देखील समावेश आहे. या सर्वाना समन्स पाठविण्याची तयारी एनसीबीने केली आहे. याप्रकरणी जैद आणि बशीद या दोन संशयितांकडून एनसीबी मुंबईतील ड्रग्स वर्तुळाबाबतची महत्त्वपूर्ण माहिती घेतली आहे. संशयीत जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून त्याची चौकशी याप्रकरणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तो वांद्रे परिसरात सक्रिय होता.

जैदने  17 मार्च दिलेल्या ड्रग्स डिलेव्हरीचे तार सुशांत सिंग प्रकरणाशी जुळत आहेत. त्या माहितीच्या आधारे एनसीबीने बशीद परिहार नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाला देखील ताब्यात घेतले. हा तोच बशीद आहे याच बशीदने या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीची ओळख जैदशी केल्याचे बोलले जात आहे. जैद हा बांद्राला राहत असून त्याचे पूर्ण नाव जैद विलात्रा आहे. तर एनसीबीच्या हाती एक व्हॉट्सअॅप चॅट लागले आहे. ज्यात या जैद आणि बशीदचे नाव आहे. याप्रकरणी आतापर्यंत रियासह 10 जणांना अटक झाली आहे.

रियाचा जामीन अर्ज फेटाळला

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने ( एनसीबी) दाखल केलेल्या गुन्ह्यात शुक्रवारी रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने नामंजूर केला. जामिनासाठी आता उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे रियाच्या वकिलांनी सांगितले. तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे, त्यामुळे आता आरोपींना जामीन मंजूर करु नये, अन्यथा साक्षी पुरावे प्रभावित होऊ शकतात, हा एनसीबीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. सुशांत अंमलीपदार्थ घेतो हे रियाला माहित होते तरीही ती त्याला प्रतिबंध न करता त्याच्यासाठी मागवायची आणि त्याचे पैसेही द्यायची असा आरोप एनसीबीने केला आहे.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Sushant Singh suicide case List of 18 suspects Bollywood ready


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh suicide case List of 18 suspects Bollywood ready