इथे कोरोनाला नाही दिला थारा...

शर्मिला वाळुंज
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातातील 27 गावांतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापण्यास मान्यता मिळालेली 18 गावेही कोरोना विषाणूपासून पूर्णतः दूर आहेत. या गावांनी वेळीच घेतलेला गावबंदीचा निर्णय आणि पालिकेने निभावलेले पालकत्व यामुळेच या गावांत कोरोनाचा अद्याप शिरकावदेखील झालेला नाही.

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट असणाऱ्या 27 गावांत मात्र याहून वेगळे चित्र आहे. निळजे आरोग्य केंद्र परिसरात एक रुग्ण आढळून तो बरा होऊन घरीही परतला आहे, त्यानंतर मात्र या परिसरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

क्लिक करा : कोरोनाबाधितांसाठी ठाण्यात डॉक्टरांची फौज

 27 गावांतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापण्यास मान्यता मिळालेली 18 गावेही या विषाणूपासून पूर्णतः दूर आहेत. या गावांनी वेळीच घेतलेला गावबंदीचा निर्णय आणि पालिकेने निभावलेले पालकत्व यामुळेच या गावांत कोरोनाचा अद्याप शिरकावदेखील झालेला नाही.

महापालिकेकडून होत असलेली गावांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यामुळे गावांची आरोग्यव्यवस्था ठिक ठाक आहे, अन्यथा पालिकेतून गावे वगळली असती तर या महामारीच्या काळात गावांना कोणी वालीच राहीला नसता अशी भावना येथील गावकरी व्यक्त करीत आहेत. 

क्लिक करा : यूपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांपैकी 18 गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात येईल, तर उर्वरित 9 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने ती महापालिका परिसरातच ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्चमध्ये विधिमंडळात केली होती.

त्यानंतर काही दिवसांतच जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा देशातही शिरकाव होऊ लागल्याने केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे 18 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करणारा अध्यादेश निघू शकला नाही; परिणामी ही गावे अद्याप कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातच आहेत. 

कोरोनाने कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात शिरकाव करताच ग्रामस्थांनी गावबंदी करत संपूर्ण गावाला क्वारंटाईन करून घेतले. ग्रामस्थांनी हा निर्णय त्वरित घेतल्याने गावातील कोणी बाहेर जाऊ शकले नाही. तसेच गावातही बाहेरील व्यक्ती न आल्याने साथ रोग पसरला नाही.

तसेच पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रोज गावात साफसफाई, जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, 18 गावांची स्वतंत्र नगरपालिका हवी आहे; परंतु सध्याच्या घडीला तो अध्यादेश निघाला नाही तेच योग्य झाले. अध्यादेश निघाला असता आणि महापालिकेतून गावे वगळली गेली असती, तर आता या गावांकडे कोणी लक्ष दिले असते, अशी भीती ग्रामस्थ भूषण पाटील यांनी व्यक्त केली. 

अध्यादेश न निघाल्यामुळे 18 गावे महापालिका क्षेत्रातच असून महापालिका त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहे. गावात दररोज जंतुनाशक फवारणी होते, तसेच स्वच्छता राखण्यावरही भर दिला जात आहे. लॉकडाऊनचेही नागरिक योग्य पद्धतीने पालन करीत आहेत. गावे महापालिका क्षेत्रात असल्यानेच ती आजारांपासून अद्याप दूर आहेत. 
- प्रकाश म्हात्रे, कल्याण ग्रामीण
तालुकाप्रमुख शिवसेना. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taking precautions, villages were spared from Corona