मृत्यूची दरड : तळीयेच्या दरीत उरलाय फक्त आक्रोश

मृत्यूची दरड : तळीयेच्या दरीत उरलाय फक्त आक्रोश
Summary

कष्टाने उभ केलेलं गावाकडचं घर आणि घरातील जीवाभावाच्या माणसांचा झालेला चिखल पाहिल्यावर उभे राहण्याची ताकदच संपून जात होती.

"अरे, बाबा, कुठे आहेस तु....! आई मला एकदा तरी मला कुशीत घे ना ग.. " अशा आवाजानंतर भीषण शांतता. पुन्हा, एका कोपऱ्यातुन भावा-बहिणीच्या नावाने आक्रोश, पुन्हा शांतता. कोणी आईच्या नावाने, तर कोणी पोटच्या पोरांसाठी स्वत:ची छाती बदडून घेत. थोड्या थोड्या अंतराने आक्रोशाच्या किंकाळ्या तळीयेच्या दरीत ऐकू येत होत्या. पावसाची रिपरीप आणि पायाखालचा चिखल तुडवत भीषण शांततेत तळीये गावाच्या बाहेर हजारो लोक जमा होती. महाड तालुक्यातील 'तळीये गावावर दरड कोसळली' ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावात राहणाऱ्या नातेवाईकांच्या काळजीने मुंबई, पुण्यात राहणारे त्यांचे नातेवाईक तळीये गावात परतत होते. पण काय? ज्या गावात लहानाचे मोठे झाले, त्यांना समोर गावच राहिलेले नाही यावर विश्वासच बसत नव्हता. कष्टाने उभ केलेलं गावाकडचं घर आणि घरातील जीवाभावाच्या माणसांचा झालेला चिखल पाहिल्यावर उभे राहण्याची ताकदच संपून जात होती. अगदी विदारक, आणि तितकेच मनाचा थरकाप उडवणारे हे दृश्य नजरे समोरुन दूर होत नाही.

घटना कशी घडली हे सांगणारे फक्त पाचजण उरलेत आणि ते देखील रुग्णालयात काहीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत. एकूण मयत असलेल्या 84 जणांपैकी 36 जण साठीच्या वरील वयोवृद्ध. यातही महिलांची संख्या अधिक. कोकणातील सर्वच खेड्याप्रमाणे उमेदीच्या वयात मुंबई, पुण्यात काम करायचे, चारपैसे गाठीला साठवयाचे आणि आयुष्याची संध्याकाळ गावाकडच्या घरात अगदी शांततेत घालवायची. अडीअडचणीला शहरात कामधंदा करणाऱ्या मुलाकडे नाहीतर नातवंडाकडे पैसे मागायचे. वर्षानुवर्ष हीच पद्धत चालू आहे, फरक इतकाच पडला की, पुर्वी मनीऑर्डर यायची आणि आता गुगल पे वरुन पैसे येतात. हीच रित तळीये गावातीलही लोकांची असल्याने 250 मतदान यादीत नावे असलेल्या या गावात जेमतेम 95 लोक घटनेच्या वेळी रहात होती. बाकीचे सर्व कामाधंद्यासाठी बाहेरगावी आपल्या कुटुंबासह राहतात. मात्र, या चाकरमान्यांचं गावावरील प्रेम कधीच कमी झालेलं नव्हतं. नेहमी गौरी-गणपतीच्या सणाला चाकरमान्यांनी गजबजून जाणारा तळीये गाव यंदा मात्र थोडा लवकर गजबजलय.

मृत्यूची दरड : तळीयेच्या दरीत उरलाय फक्त आक्रोश
तळीये दुर्घटना: ग्रामस्थांच्या विनंतीनंतर प्रशासनानं थांबवली बचाव मोहिम

प्रत्येकजण गावाकडे येताना डोक्यावर दु:खाचे न पेलवणारे बोचके घेऊन येत आहे. कोणीही जिवंत राहीलेले नाही या बोचक्याचं वजन इतके आहे की, त्यातून सावरण्यासाठी कित्येक वर्ष जावी लागतील. एका दिवसात तळीयेतील चाकरमानी अपुलकीच्या हाकेला पोरके झालेत. वडीलधाऱ्यांचे छत्र हरपलेले हे सर्वजण तळीये गावच्या बाहेर उघड्यावर बसुन आपल्या नातलगांना हाका मारीत आहेत. गावातून कोणीतरी येईल आणि आपल्या डोक्यावरचं बोचकं आपल्याकडे घेऊन ओझ कमी करील. यासाठीचा आक्रोश घटनेच्या तिसऱ्या दिवशीही कायम आहे.

" अगं, आज्जे तु कुठे आहेस, मी पास झालोय," असे म्हणणारा नातू. "अहो आई, आम्हाला सोडून का गेल्यात, आम्ही आता कोणाच्या घरात उतरु" असा तांडव करीत कपाळ फोडून घेणारी सुन. "माहेरपणाला कोणत्या गावात जावू" असा न पाहता येणारा मुलीचा आक्रोश थांबत नाही. दरीत घोंगावणारा वाऱ्याचा आवाज आणि भर पावसात मन हेलावून सोडणारा आक्रोश सुरुच आहे. राजकीय नेते येतात आणि दुःख व्यक्त करुन निघून जातात. प्रशासनानेही त्यांचे सोपस्कर पुर्ण केलय. जे मृतदेह सापडले नाहीत त्या सर्वांना बेपत्ता घोषित करत प्रशासनाचे अधिकारीही येथून निघून घेलेत आणि तळीयेच्या दरीत उरलाय फक्त आक्रोश...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com