मुंबईत 3 लाख सीसीटीव्हींचे जाळे तयार करण्याचे लक्ष्य; पोलिसांना मिळणार सात हजार अतिरिक्त कॅमरे

अनिश पाटील
Wednesday, 16 December 2020

खासगी आस्थापनांनाही सीसीटीव्ही बसवण्याची विनंती करणा-या मुंबई पोलिसांनी शहरात 3 लाख सीसीटीव्हींचे जाळे तयार करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहेत.

मुंबई - खासगी आस्थापनांनाही सीसीटीव्ही बसवण्याची विनंती करणा-या मुंबई पोलिसांनी शहरात 3 लाख सीसीटीव्हींचे जाळे तयार करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहेत. त्यामुळे शहरातील कानाकोप-यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. तसेच लवकरच मुंबई पोलिसांना लवकरच सात हजार अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे मिळणार आहेत.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सीसीटीव्हीच्या मदतीने शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यात यश येऊ शकते, तसेच मोठ्या महानगरांवर लक्ष ठेवण्याचे प्रमुख साधन ठरू शकते, या संकल्पनेतून मुंबई पोलिसांनी खासगी आस्थापनांच्या मदतीने सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्याचा निर्णय घेतला असून कलम 144 अंतर्गत नुकताच शहरातील सर्व आस्थापनांना सीसीटीव्ही बसवण्याबाबत पोलिसांनी विनंती केली होती. त्या अंतर्गत दुकानं, ऑफिस, हॉटेल, समारंभाचे सभागृह, धार्मिक स्थळे, रहिवासी सोसायट्या इ. यांना सीसीटीव्ही बसवण्यास सांगण्यात आले आहे.
शहरातील बहुसंख्य खासगी आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात जवळपास  तीन लाख सीसीटीव्हींचे जाळे निर्माण होईल. त्यामुळे शहरातील प्रत्येक कानाकोप-यावर लक्ष ठेवणे शक्य होणार असून त्यामुळे शहरातील गुन्हे कमी होण्यास नक्की मदत होईल, असे सह पोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे यांनी सांगितले.
सध्या मुंबई पोलिसांचे स्वतःचे साडे पाच हजार सीसीटीव्ही आहेत. त्यांच्या सहाय्याने शहरातील विविध हालचालींवर लक्ष ठेवण्यात होते. त्याच्या जोडीला आता मुंबई पोलिसांना सात हजार अतिरिक्त सीसीटीव्ही मिळणार आहेत. या 10 हजारांहून अधिक सीसीटीव्ही नेटवर्कच्या जोडीला आता खासगी आस्थापनांकडून अडीच लाखांहून अधिक सीसीटीव्ही बनवण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे शहराची सुरक्षा अधिक सक्षमरित्या पोलिसांना करणे शक्य होणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही न बसवणा-या खासगी आस्थापनांमध्ये गुन्हा घडल्यास अशा आस्थापनांवर कलम 188 अंतर्गत पोलिस कारवाई करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या सर्कुलरनुसार दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला असून तो कालावधी जानेवारी महिन्यात संपत आहे.

BMC च्या स्मार्टफोन उपक्रमाचा कोविड -19 रुग्णांवर सकारात्मक परिणाम

आम्हाला कोणावरही जोर जबरदस्ती करायची नाही. पण शहराच्या व स्वतःच्या सुरक्षेसाठी खासगी आस्थापनांनी पुढाकार घेऊन पोलिसांना मदत करावी, असे एका अधिका-याने सांगितले. दिल्लीसारख्या शहरांनी अशा योजना यापूर्वीच राबवण्यास सुरवात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात सीसीटीव्हींबाबत कायद्यातही काही बदल होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

Target to build 3 lakh CCTV network in Mumbai Police will get 7,000 extra cameras

-----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Target to build 3 lakh CCTV network in Mumbai Police will get 7,000 extra cameras