नॉन कोव्हिड खाटांसाठी टास्क फोर्सची शिफारस; खासगी रुग्णालयांचा फॉर्म्युला 60:40 वर आणण्याचा सल्ला

भाग्यश्री भुवड
Saturday, 7 November 2020

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने खासगी रुग्णालयांना नॉन कोव्हिड खाटा वाढवू देण्याची शिफारस टास्क फोर्सच्या सदस्यांनी केली आहे.

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने खासगी रुग्णालयांना नॉन कोव्हिड खाटा वाढवू देण्याची शिफारस टास्क फोर्सच्या सदस्यांनी केली आहे. सध्याचा 80 कोव्हिड आणि 20 नॉन कोव्हिडचा फॉर्म्युला आता 60:40 वर आणण्याचा सल्ला समितीने दिला आहे. 

हेही वाचा - ट्रान्सजेंडरला पाठिंबा देत अक्षय कुमारने शेअर केला व्हिडिओ, म्हणाला अब हमारी बारी है 

संपूर्ण राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना खासगी रुग्णालयांमध्ये इतर आजारांच्या रुग्णांची वाढ होत असून बेडचा तुटवडा निर्माण होतो. त्याच पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांना इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी कोव्हिड नसलेल्या बेडची संख्या वाढवण्याची परवानगी द्यावी, असा सल्ला राज्य कोव्हिड टास्क फोर्सने सरकारला दिला आहे. 
कोव्हिड रुग्णांसाठी 80 आणि नॉन कोव्हिड रुग्णांसाठी 20 असा फॉर्म्युला न ठेवता तो 60:40 असा करावा, असा सल्ला राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे. जर कोरोनाची दुसरी लाट आलीच तर या फॉर्म्युल्यात बदल करता येऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून एक हजाराहूनही कमी कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णालयांमध्ये अलगीकरणासाठी अतिरिक्त बेड उपलब्ध झाले आहेत. एस. एल. रहेजा रुग्णालयात 154 पैकी 130 बेड कोव्हिड रुग्णांसाठी राखीव आहेत; पण फक्त 55 भरलेले आहेत. "मे मध्ये आम्ही 130 आयसोलेशन बेड्‌स देण्याचे मान्य केले. ती संख्या कमी करण्यास सरकारने आम्हाला परवानगी दिलेली नाही. बरेच रिकामे बेड्‌स आहेत, ज्यांचा नॉन कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी आम्ही वापर करू शकत नाही,' असे वैद्यकीय संचालक डॉ. हिरेन आंबेगावकर यांनी सांगितले. 

हेही वाचा - राज्यपाल कोणताही राजकीय 'बखेडा' निर्माण करणार नाहीत; यादी दिल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

बॉम्बे रुग्णालयातही कोव्हिड रुग्णांत सातत्याने घट झाली असून इतर रुग्णांची संख्या वाढत आहे. नॉन कोव्हिड सुविधा पूर्णपणे सुरू आहे, असे सल्लागार डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले. 
भाटिया रुग्णालयात सध्या 120 पैकी 65 बेड कोव्हिडसाठी राखीव आहेत. उर्वरित नॉन कोव्हिडसाठी आहेत. वैद्यकीय संचालक डॉ. आर. बी. दस्तूर म्हणाले, की कोव्हिड नसलेला विभाग रुग्णांनी पूर्ण भरलेला आहे. कोव्हिड विभागात मात्र बेड रिकामे आहेत. 

अधिसूचना नोव्हेंबरपर्यंत 
कोव्हिडच्या रुग्णांमध्ये घट झालेल्या खासगी रुग्णालयांना बेड कमी करण्यासाठी सवलत दिली जाऊ शकते. 80:20 राखीव बेडची नवीन अधिसूचना नोव्हेंबरपर्यंत चालेल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच दिले

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Task Force Recommendations for Non Covid Beds Private hospitals advised to bring the formula to 60:40