esakal | लोकलमध्ये 'नो एन्ट्री', दहावीच्या मूल्यमापनाच्या पहिल्याच दिवशी खेळखंडोबा
sakal

बोलून बातमी शोधा

local train

दहावीच्या मूल्यमापनाच्या पहिल्याच दिवशी खेळखंडोबा

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचा (ssc-result-2021-evaluation) कार्यक्रम आजपासून सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु नसल्यामुळे शिक्षकांना शाळेत पोहोचता आलं नाही. त्यामुळेच मूल्यमापन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी खेळखंडोबा झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला असंख्य शिक्षक हे मुंबई उपनगरात राहत असून सध्या तरी सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. (teachers-cell-demands-to-permit-train-travel-for-teachers-for-ssc-result-2021-evaluation)

मुंबई आणि परिसरात असलेल्या उच्च माध्यमिक शाळातील 70 टक्क्यांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मुंबईबाहेर राहतात. यात खासकरुन अनेक शिक्षक बदलापूर, कर्जत, कसारा, अंबरनाथ, टिटवाळा, शहाड आदी परिसरात राहतात. त्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा आज न मिळाल्याने ते आपल्या शाळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवशी त्यांच्या या कामकाजाला खोडा बसल्याची प्रतिक्रिया शिक्षकांकडून देण्यात आली.

हेही वाचा: जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचं वजन किती माहित आहे का?

रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर तिकीट मिळत नसल्याचं सांगण्यासाठी अनेक शिक्षकांनी तिकीट खिडकीवरुन सेल्फी काढून ते शाळा व संघटनांना पाठवले आहेत. तर, काही शिक्षकांनी तिकीट नाकारल्यानंतर त्यांना दाखवण्यात आलेल्या परिपत्रकाची माहिती दिली आहे.

"मागील 15 दिवसापासून आपण सरकारकडे दहावीचे कामकाज करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी करत आहोत. मात्र ती अद्याप देण्यात आला नाही. यामुळे आज शिक्षकांचे कामकाज थांबले असून त्याला जबाबदार कोण", असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना केवळ दहावीच्या गुण नाही तर नववी आणि खासगी विद्यार्थ्यांसाठी पाचवीतील गुण आणि त्याची माहिती गोळा करण्याची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना केवळ आपल्या शाळेत नाही. तर, दुसर्‍या शाळेमध्ये जाऊन सुद्धा ही माहिती गोळा करणे आवश्यक आहे.

"आज पहिल्याच दिवशी अनेक शिक्षकांना मुंबई आणि परिसरात लोकल प्रवासाची मुभा न मिळाल्याने हे गुण गोळा करतांना त्यांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यामुळे आता तरी सरकारने ही प्रवासाच्या संदर्भात वेगळी अधिसूचना जारी करावी", अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी केली.

संपादन : शर्वरी जोशी