8 महिन्यांनंतर उघडली मंदिरांची दारं, भाजप नेत्यांकडून श्रेयवादाची लढाई

पूजा विचारे
Monday, 16 November 2020

भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिलं जात आहे. मंदिरांची दारं उघडल्यानंतर राजकारण होण्यास सुरुवात झाली आहे. 

मुंबईः  तब्बल 8 महिन्यांनंतर आता मंदिरं भाविकांसाठी नियम आणि अटींचं पालन करून उघडण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. राज्यासह मुंबईतही मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळं खुली झालीत. मंदिरं पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिलं जात आहे. मंदिरांची दारं उघडल्यानंतर राजकारण होण्यास सुरुवात झाली आहे. 

सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार असल्याचं ट्वीट भाजपचे आमदार राम कदम यांनी केलं. तर हिंदुत्ववादी संघटना, सांप्रदायिक मंडळी यांना मंदिरे खुली करण्याच्यासंदर्भात भाजपाने पूर्ण ताकदीने समर्थन दिलं, असल्याचं मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले प्रविण दरेकर 

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आंदोलने, सांप्रदायिक मंडळींनी घेतलेली ठाम भूमिका आणि या भूमिकेला भाजपाने दिलेले समर्थन या दबावामुळेच राज्य सरकारला मंदिरे खुले करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण यासाठी आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कुठल्याही श्रेयासाठी आम्ही हा विषय हाती घेतला नव्हता, असं स्पष्ट मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा-  धारावीतून दिलासादायक बातमी, केवळ एका रुग्णाची भर

आमच्या दबावामुळे सरकारला मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे आमच्या मनासारखा निर्णय झाल्यानंतर यासाठी आनंद व्यक्त केला आणि आनंदोत्सव साजरा करण्यात काही गैर नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले राम कदम

राम कदम यांनी ट्वीट करत म्हटलं की, उद्या सकाळी 11 वाजता सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे. जल्लोष साजरा करणार. 

अधिक वाचा-  मुंबईतल्या मंदिरांमध्ये आजपासून दर्शनास सुरुवात, भाविकांमध्ये आनंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मदिरं सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मंदिरं खुली करण्याच्या निर्णयानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरु होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील मंदिर खुली करावी यासाठी भाजपने विविध ठिकाणी आंदोलने केली होती. भाजपाने सिद्धिविनायक मंदिरातही आंदोलन केलं होतं.

temples reopened after 8 months battle of credentials by BJP leaders Ram kadam pravin darekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: temples reopened after 8 months battle of credentials by BJP leaders Ram kadam pravin darekar