esakal | मोबाईलच्या डिपीवर मित्राचा फोटो ठेवून दहा लाखांची फसवणुक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मोबाईलच्या डिपीवर मित्राचा फोटो ठेवून दहा लाखांची फसवणुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अमेरिकेत (America) वास्तव्यास असलेल्या मित्राचा फोटो मोबाईलवर डीपी ठेवून दहा लाख रुपयांची फसवणुक करणार्‍या एका भामट्याला कांदिवली (Kandivali) येथून मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सम्राट सुरेंद्रकुमार चौधरी (Surendrakumar Chaudhary) असे या ४६ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी (Police) आठ लाख तेरा हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस (Police)कोठडीत असून त्याच्या अटकेने फसवणुकीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अजय मेहता हे मध्य मुंबईतील रहिवाशी आहेत. त्यांचा श्रीराम सोमेश्‍वर नावाचा एक मित्र असून तो सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. काही दिवसंपूर्वी त्याचा फोटो एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरील डीपीवर ठेवून त्यांच्याशी व्हॉटअप चॅट केले होते. या संदेशात त्याने तोच त्यांचा मित्र असल्याचे भासवून त्याच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती. पैशांची तातडीने गरज असून ती रक्कम त्याला लवकरच परत केली जाईल असे त्याने सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून अजय मेहता यांनी त्याला ऑनलाईन दहा लाख रुपये पाठविले होते. काही दिवसांनी त्यांनी त्याच्याकडे पैशांविषयी विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना बंदूकीचा एक फोटो पाठविला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी श्रीराम सोमेश्‍वरला दुसर्‍या मोबाईलवर संपर्क साधला होता.

हेही वाचा: परीक्षा अर्ज भरला गणिताचा, गुण जीवशास्‍त्राचे! अजब प्रकार

यावेळी त्यांना श्रीरामने त्यांच्याकडे कधीच पैशांची मागणी केली नसल्याचे उघडकीस आले. कोणीतरी त्याचा फोटो डीपीवर ठेवून त्याच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून दहा लाख रुपये उकाळल्याचे समजले. या घटनेनंतर त्यांनी मध्य प्रादेशिक सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांच्या पथकातील अमर कांबळे, निलेश हेंबाडे, शुक्ला आणि लोखंडे यांनी तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असतानाच कांदिवली येथे वास्तव्यास असलेल्या सम्राट चौधरी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानेच तक्रारदारांना श्रीरामच्या नावाने संपर्क साधून त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते. या दहापैकी आठ लाख तेरा हजार रुपयांची रक्कम विविध बँक खात्यात गोठविण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच अजय मेहता यांना परत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top