राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पु्न्हा उफाळून येणार! वाचा काय आहे प्रकरण...

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत तत्काळ निर्णय घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउनमध्ये आता काही प्रमाणात शिथिलता दिली जात असताना, शिक्षण क्षेत्राबाबत ठोस निर्णय अद्याप झालेले नाही. राज्यातील विविध विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत तत्काळ निर्णय घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. यासंदर्भातील पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाला परीक्षा रद्द करण्यासंदर्भात मागणी केली होती. राज्यपाल कोशारी यांनी या मागणीलाही विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनो...! परिक्षेबाबत मुंबई विद्यापीठाने घेतला महत्वपूर्ण निर्णय, वाचा

देशात कोरोनाचा वाढता संसर्गाचा परिणाम म्हणून देशातील सर्वच विद्यापीठांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. या मार्गदर्शक तत्वांचा आधारे आणि राज्य सरकारने याबाबत नेमलेल्या समितीच्या शिफारशी नुसार महाविद्यालयांमध्ये अंतिमवर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली होती. परंतु, राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने उच्च शिक्षण व तंत्र मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीवर आयोगाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. परंतु मंत्री सामंत यांनी आयोगाला केलेल्या मागणीला राज्यपाल कोशारी यांनी विरोध केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी नुकत्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात तत्काळ अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात निर्णय घ्यावा तसेच, मंत्री उदय सामंत यांनी आयोगाला केलेली मागणी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016चे उल्लंघन करणारी आहे. असे म्हटले आहे. हे आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यासारखे असून, या पत्राबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अरे वा! चित्रपटांचे शुटिंगही सुरू होणार? सांस्कृतिक सचिवांना मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी लिहलेल्या पत्रात अंतिम वर्षाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात महत्वाची असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे ही परिक्षा न घेतल्यास, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या परीक्षांसंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन, विद्यापीठ अनुदान आयोगाने लॉकडाउन असताना परीक्षा कशा स्वरुपात घ्याव्यात याबद्दल सूचना जारी केल्या आहेत. असेही त्यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत याबाबत काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government dispute against Governor will flare up again! The governor also expressed displeasure over the education minister