अरे वा! चित्रपटांचे शुटिंगही सुरू होणार? सांस्कृतिक सचिवांना मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 23 May 2020

  • दक्षता बाळगून चित्रीकरण सुरू होऊ शकते का? 
  • मुख्यमंत्र्यांची मनोरंजन क्षेत्राच्या प्रतिनिधींशी चर्चा

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन चौथा टप्प्यात गेला आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. काही चित्रपट संस्थांनी चित्रीकरण सुरू करण्याचे प्रस्ताव सरकारकडे मांडले होते. त्यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. योग्य ती दक्षता घेऊन मुंबईत चित्रीकरण सुरू होऊ शकते का, याची तपासणी करण्यास त्यांनी सांस्कृतिक कार्य सचिवांना सांगितले.

खासगी वाहनाने परवानगी घेऊन प्रवास करताय? जरा थांबा! आणि ही बातमी वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मुंबईतील रेड झोन वगळता इतर ठिकाणी चित्रीकरण सुरू करता येईल का, यावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी फाऊंडेशनला चित्रीकरणाबाबतचा आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी चिंतेचे कारण नाही. या संकटावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

लॉकडाऊनमुळे मनोरंजन क्षेत्राला फटका बसला आहे. आपण यापूर्वीच रेड झोन वगळता इतर ठिकाणी मर्यादित प्रमाणात व्यवहार सुरू केले आहेत. गुरुवारीच मराठी चित्रपट निर्माते, कलाकारांसोबत चर्चा केली. त्यांच्या मागणीप्रमाणे पोस्ट प्रॉडक्शनची कामे किंवा शहरांबाहेर मर्यादित प्रमाणात चित्रीकरण करता येऊ शकेल का यावर विचार करत आहोत, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. 

फाऊंडेशनने आराखडा द्यावा, तो सांस्कृतिक कार्य विभागाकडून तपासून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये फाऊंडेशनचे अध्यक्ष एन. पी. सिंग, संचालक पुनीत गोयंका, जे. डी. मजिठिया, नितीन वैद्य, एकता कपूर, पुनीत मिश्रा, राहुल जोशी, आदेश बांदेकर, अभिषेक रेगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. संजय मुखर्जी आदी सहभागी झाले होते.

भयंकर! आपले रक्षकच होताहेत कोरोनाचे भक्षक! एकट्या मुंबईत 'इतक्या' पोलिसांना कोरोनाची लागण

'सरकार खंबीरपणे पाठीशी'
टीव्ही उद्योग हा मनोरंजन क्षेत्राचा मोठा भाग आहे. अनेकांचे रोजगार त्यावर अवलंबून आहेत. हा उद्योग अधिक मजबूत व्हावा म्हणून सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shooting will also start? Order given by the Chief Minister to the Cultural Secretary