esakal | ठाण्यात 14 गावांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात 14 गावांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या 14 गावांतील सर्व पक्षीय विकास समितीने घेतला आहे.

ठाण्यात 14 गावांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

मुंबईः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा करताच ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या 14 गावांतील सर्व पक्षीय विकास समितीने घेतला आहे. यामध्येही शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बहिष्काराला पाठींबा दिला आहे, तर काही शिवसैनिकांना मात्र निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. शिवसैनिकांची आज बैठक होणार असून या बैठकीत काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमधून शिळफाटा परिसरातील 14 गावे वगळण्यात आली आहेत. ही गावे नवी मुंबई, ठाणे की कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये वर्ग करायची हा प्रश्न गेले कित्येक वर्षे भिजत पडला आहे. महापालिकेतून गावे वगळण्यात आल्यानंतर कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली. मात्र गावातील विकासकामे रखडल्याने गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश केला जावा अशी मागणी 2015 पासून येथील ग्रामस्थांनी लावून धरली आहे. 

सरकारकडे वारंवार मागणी करुनही ही मागणी मान्य न झाल्याने ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणार होती. याचदरम्यान 14 गावांच्या वाकळण, नागाव, दहिसर, पिंपरी आणि नारिवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकांवरही बहिष्कार घालण्याचा निर्णय मार्च महिन्यात सर्व पक्षीय विकास समितीने घेतला होता.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना संक्रमणामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. डिसेंबर महिन्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री सर्व पक्षीय विकास समितीची बैठक पार पडली. यावेळी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, विजय पाटील, गुरुनाथ पाटील, अनिल भोईर, काशीनाथ पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एकमताने निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. या बहिष्काराला मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही पाठिंबा दिला असल्याचे समजते.

हेही वाचा-  मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा दर 332 दिवसांवर

सर्व पक्षीय समितीच्या निवडणूक बहिष्काराला बैठकीत उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. मात्र 14 गावांतील काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याने त्यांची बुधवारी एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे सर्वपक्षीय समितीत फूट पडून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thane 14 villages boycott Gram Panchayat elections

loading image