Thane Vidhansabha 2024: एक ठाणेदार, ढिगभर दावेदार! ठाणे विधानसभेत काय घडतंय? जाणून घ्या मतदारसंघाचा आढावा
ठाणे, ता. १७ : शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे विधानसभेवर २०१४ मध्ये कमळ फुलले. सलग दोनदा भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर या मतदारसंघातून निवडून आले. पक्षाने पुन्हा संधी दिली तर विजयाची त्यांची हॅटट्रिक पक्की मानली जात आहे. महायुतीसाठी हा अत्यंत सुरक्षित मतदारसंघ बनला आहे. असे असले तरी निवडणुकीआधीच उमेदवारीवरून या मतदारसंघात कलह निर्माण झाला आहे.
एक ठाणेदार, ढिगभर दावेदार अशी अवस्था येथे आहे. भाजपमध्येच इच्छुकांची उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे महायुतीतील शिवसेना शिंदे गटही या मतदारसंघावर दावा ठोकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा जागावाटपात ठाण्यावरून गाडे अडण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेना ठाकरे गटही उभा ठाकला आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार यावर ठाणेकरांचे लक्ष आहे.
मुंबईपेक्षा ठाणे हा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला मानला जात होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घातलेल्या शिवसेनेचा ठाण्यातील प्रचार आणि प्रसार आनंद दिघे यांनी केला. ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली; पण अगदी ९०च्या दशकापासून इथे शिवसेनेचे आमदार होते. मो. दा. जोशी १९९० मध्ये पाहिल्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून इथे निवडून आले. त्याआधी काँग्रेसची सत्ता इथे होती; पण ९० नंतर २०१४ पर्यंत इथे केवळ आणि केवळ शिवसेनाच उमेदवार निवडून आला आहे.
अगदी आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २००४ला इथून पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर गेले. २००९ला मात्र या मतदारसंघाचे विभाजन झाले आणि केवळ जुने ठाणे या मतदारसंघात ठेवले गेले. तेव्हा पण सेनेचे राजन विचारे या मतदारसंघातून विधानसभेवर गेले. २०१४ला शिवसेना- भाजपमधील युती तुटली आणि अनपेक्षितपणे ही जागा भाजपकडे गेली. तेव्हापासून सलग दोन वेळा भाजपचे संजय केळकर आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत.
गेल्या दहा वर्षांमध्ये आमदार संजय केळकर यांनी आपला मतदारसंघ चांगला बांधला आहे. अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा आणि समस्यांची जाण असलेला आमदार म्हणून ते ठाणेकरांच्या पसंतीस उतरले आहेत. कामगार घटकापासून ते उच्चभ्रू रहिवाशांपर्यंत त्यांचा चांगला संपर्क आहे. कोविड काळातही ते घराघरात पोहोचले. ठाणे महापालिकेतील अनेक गैरव्यवहारांवर त्यांनी बोट ठेवले, तसेच विधानसभेमध्येही ठाण्यातील रखडलेले प्रश्न, समस्यांबाबत आवाज उठवला. अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे भाजपसाठी ठाणे हा आता अत्यंत सुरक्षित मतदारसंघ बनला आहे. त्यातही आमदार संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे; पण इथेच सर्व गोम आहे.
आता या मतदारसंघासाठी भाजप पक्षांतर्गत इच्छुकांच्या मनात उकळ्या फुटत आहेत. त्यासाठी जातीय फोडणी देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आधी ब्राह्मण उमेदवार नको असा प्रसार करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या मतदारसंघातील बहुतेक भागांत आगरी-कोळी समाजाचे वर्चस्व आहे. त्यामुळे सुशिक्षित भूमिपुत्रांना उमेदवारी देण्याची इच्छा प्रकट केली. त्यासाठी डॉ. राजेश मढवी यांच्या नावाची चर्चा पेरण्यात आली. मराठा कार्डसाठी संजय वाघुले यांचे नावही पुढे करण्यात आले आहे. याशिवाय संधी मिळाली तर अॅड. संदीप लेलेसुद्धा तयार आहेतच.
ठाण्यात भाजपमध्ये अजूनही शिस्त कायम असल्याने पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण झाले तरी उघडपणे ते होणार नाही. पक्ष उमेदवारी देईल त्याला गपगुमान निवडून आणण्यात येईल; पण आता पक्ष ही संधी देईल का, हा प्रश्नही भाजपच्या विद्यमान आमदारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पडला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने हट्टाने हिसकावून घेतला. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होण्याची धाकधूक आहे. हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा होता. त्यामुळे पुन्हा या मतदारसंघावर भगवा फडकवण्याची तीव्र इच्छा शिवसेनेच्या दोन्ही गटाला आहे.
अर्थात शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. राजन विचारे हे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तर, शिवसेना शिंदे गटातही या मतदारसंघासाठी आग्रह असल्याचे समजते. माजी महापौर ते थेट खासदार अशी नरेश म्हस्के यांना जशी लॉटरी लागली तशी आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी शिंदे गटातही इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय डावपेच खेळतात, यावर लक्ष लागले आहे. मनसेचे अविनाश जाधव हेसुद्धा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
मतदारसंघाची रचना
ठाणे शहर मतदारसंघात ठाणे स्टेशनच्या पश्चिमेकडील भाग येतो. जुने ठाणे याच मतदारसंघात आहे. ठाण्याची प्रमुख ओळख असलेले भाग इथेच आहेत. ठाणे मुख्य मार्केट, नौपाडा, राम मारुती रोड, मासुंदा तलाव, टेंभी नाका, ठाणे जेल, कोपीनेश्वर मंदिर ही सर्व ठिकाणे इथेच आहेत.
पुढे मतदारसंघाच्या विस्तारात पाचपाखाडी, चंदनवाडी, भक्ती मंदिर, नौपाडा, विष्णू नगर, गोखले रोड, गावदेवी, हंस नगर, खोपट, कोलबाड, उथळसर, गोकुळ नगर, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटल, पोलिस लाइन जरी मरी, खारकर आळी, खारटन रोड, महागिरी, तलावपाळी, ढोकाळी, मानपाडा, खेवरा सर्कल, बाळकुम, मनोरमा नगर, ब्रम्हांड, गांधी नगर, धर्मवीर नगर, वसंत विहार, वृंदावन, राबोडी एक, राबोडी दोन यांसोबत इतर भागही जोडले गेले.
या मतदारसंघात मुख्यतः ब्राम्हण समाजाची लोकसंख्या उल्लेखनीय आहे. या मतदारसंघात श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोकसंख्याही खूप आहे. ही लोकसंख्या मतदानावर प्रभाव टाकते. तर, राबोडीसारख्या विभागात मुस्लिम मतदारही आहेत.
जुन्या इमारतींचा पुनर्विकास, वाहतूक, पार्किंग समस्या
दाट लोकसंख्येच्या मानाने इथले रस्ते छोटे असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. उच्चभ्रू लोकांच्या या वस्तीत गाड्यांच्या पार्किंगसाठीदेखील जागा उपलब्ध नाही. प्रत्येक पावसाळ्यात सांडपाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. सोबत अतिक्रमणाचा मुद्दादेखील महत्त्वाचा आहे. अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे खोळंबला आहे. धोकादायक इमारतींचा प्रश्न येथे आहे. पार्किंगची व्यवस्था लोकसंख्येच्या मानाने नाही.
मतदारसंघाचा आढावा
१) २००९ मध्ये ठाणे विभाजनानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे हे ५१ हजार ०१० मतांनी निवडून आले. मनसेच्या राजन विचारे यांना दुसऱ्या क्रमांकाची ४८ हजार ५६९ मते मिळाली. काँग्रेसच्या सुभाष कानडे यांनाही ३६ हजार २८८ इतकी मते मिळाली. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत राजन विचारे यांनी बाजी मारली होती.
२) २०१४ मध्ये चित्र पूर्णपणे पालटले आणि शिवसेनेचा गड असलेल्या ठाण्यावर भाजपने सरशी केली. एकीकडे भाजपसोबत युती तुटली, तर दुसरीकडे मोदी लाट असतानाही शिवसेनेचे रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली. हा चेहरा ठाणेकरांना फारसा पटला नाही. शिवसेनेतून काँग्रेसचा हात पकडलेले आणि पुन्हा शिवसेनेत पुनर्वसन करू पाहणाऱ्या फाटक यांच्या विजयाचे फाटक ठाणेकरांनीच बंद केले आणि शिवसेनेला हातची जागा गमवावी लागली. भाजपच्या संजय केळकर यांना विजयी करण्यासाठी संघ सक्रिय झाला.
३) परिणामी, सर्वाधिक ७० हजार ८८४ मते केळकरांना मिळाली आणि ते विजयी ठरले. शिवसेनच्या रवींद्र फाटक यांना ५८ हजार २९६ मते मिळाली. आता भाजपमध्ये असलेल्या अॅड. निरंजन डावखरे त्यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढले. त्यांना अवघ्या २४ हजार ३२० मतांवर समाधान मानावे लागले.
४) २०१९ मध्ये विद्यमान आमदार संजय केळकर यांनी तब्बल ९२ हजार २९८ इतके मताधिक्य घेतले. शिवसेना-भाजप युती पुन्हा जुळून आली असली तरी शिवसेनेची मते त्यांच्या ओंजळीत फारशी पडली नसल्याचे बोलले जाते. उलट मनसेच्या अविनाश जाधव यांना मिळालेल्या छुप्या मदतीमुळे त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ७२ हजार ८७४ मते मिळाली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर एकही उमेदवार पसंतीचा नसल्याचा पाच हजार ५४७ नोटा पडल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.