Thane : ठाण्यातील नगरसेवक आज आमने-सामने येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thane
ठाण्यातील नगरसेवक आज आमने-सामने येणार

ठाण्यातील नगरसेवक आज आमने-सामने येणार

ठाणे : कोरोनाकाळात ऑनलाईन चालणारी ठाणे महापालिकेची महासभा उद्या (गुरुवारी) प्रत्यक्ष भरणार आहे. पालिका मुख्यालयाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कोविड नियमांचे पालन करून ही सभा होणार आहे. ऑनलाईन सभेत सत्ताधारी आवाज ‘म्यूट’ करून मुस्काटदाबी होत असल्याच्या तक्रारी आधीच विरोधी पक्षाने वेळोवेळी केल्या आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या प्रत्यक्ष महासभेत दीड वर्षानंतर नगरसेवक आमने-सामने येणार असून, त्यामुळे ही सभा गाजणार आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेच्या स्थायी समितीसह सर्वसाधारण आणि महासभांना चाप लागला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासकामांसाठी या सभा अत्यावश्यक असल्याने सरकारने ऑनलाईन पद्धतीने त्या घेण्याची परवानगी दिली. मात्र ऑफलाईनपेक्षाही या ऑनलाईन सभा अनेक वेळा वादळी ठरल्या. त्यातही विरोधी पक्षातील नगरसेवकांना बोलू न देणे, त्यांचे आवाज ‘म्यूट’ करण्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे कोरोनाचा कहर टळू लागल्यावर सभा प्रत्यक्ष घेण्यात यावी, यासाठी विरोधी पक्षाने न्यायालयातही धाव घेतली. तरीही त्यावर तोडगा निघू शकला नव्हता.

पण आता ‘अनलॉक-२’ नंतर जिथे सर्व व्यवहार सुरळीत आहेत, तिथे महासभाही प्रत्यक्ष घेण्यास हरकत नसल्याचे सांगत नगरविकास विभागाने त्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार स्थायी समितीची बैठक गेल्या महिन्यात झाली असून, उद्या १८ नोव्हेंबरला महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

loading image
go to top