ठाणे जिल्ह्यातील शेतीला घरघर

रवींद्र घोडविंदे
सोमवार, 24 एप्रिल 2017

शेती कमी होण्याची कारणे
नागरीकरणाचे अतिक्रमण
पर्यावरणातील बदलाचा शेतीवर होणारा दुष्परिणाम
पायाभूत सुविधांचा अभाव
नफ्याची शाश्वती नाही
शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीत रस नाही.
शेती मालाच्या मार्केटिंगमध्ये अपयश
सरकारी योजनांतून शेतीत परिवर्तन करण्याऐवजी योजना लाटण्यावर लक्ष

टिटवाळा - महानगरी मुंबईच्या नजीकचा जिल्हा असलेल्या ठाण्यात झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळेच शेती क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. २०१५-१६ या वर्षात तर खरिपाचे तब्बल एक हजार ६४६ हेक्‍टर क्षेत्र कमी झाले आहे. या वर्षी हा आकडा मोठा होण्याची शक्‍यता आहे.

मुंबईच्या विस्ताराला मर्यादा असल्याने विकसकांनी त्यांचा मोर्चा ठाणे जिल्ह्याकडे वळवला आहे. त्यामुळे इमारती, घरे, फार्म हाऊस बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करण्यात येत आहेत. त्यातच या जिल्ह्यात मोठमोठे प्रकल्प प्रस्तावित असल्याने जिल्ह्यातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. दुसरीकडे शेतीव्यवसाय आतबट्ट्याचा झाल्यानेही शेतजमिनीवर गंडांतर आले असून हे क्षेत्रही दिवसेंदिवस घटू लागले आहे.

ठाणे जिल्ह्याचे १ ऑगस्ट २०१४ रोजी विभाजन होऊन ठाणे आणि पालघर हे जिल्हे तयार झाले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आता सात तालुके आहेत. यामध्ये पाच पंचायत समित्या, सहा महानगरपालिका व दोन नगरपालिका आहेत. त्यापैकी ठाणे आणि उल्हासनगर या तालुक्‍यातील शेतीचे क्षेत्र खूपच अल्प आहे. उर्वरित तालुक्‍यांमधील पिकाखालील जमिनीच्या क्षेत्रातही प्रत्येक खरीप हंगामात घट होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.  

पाण्याच्या दुर्भिक्षाचा परिणाम 
ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने चढ-उताराची आणि छोट्या-छोट्या खाचरांची जमीन आहे. येथील जमिनीची पाणीधारण क्षमता कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात जेवढ्या वेगाने पाऊस येतो, तेवढ्याच वेगाने पडलेल्या पावसाचे पाणी नद्या-नाल्यांमधून वाहत जाऊन समुद्राला मिळते. त्यामुळे रब्बी हंगामात पाण्याचे दुर्भिक्ष असते. त्यामुळेही शेतीव्यवसाय किफायतशीर नाही. त्याचा परिणाम शेतीव्यवसायावर झाला आहे. 

दृष्टिक्षेप लागवडीवर 
ठाणे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र चार लाख नऊ हजार १८६ हेक्‍टर असून खरीप हंगामातील पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र यंदा सुमारे ६५ हजार ९०८ हेक्‍टर एवढे होते; तर भातपिकाखालील सरासरी क्षेत्र  ५९ हजार २७९ हेक्‍टर होते. त्याखालोखाल तीन हजार ३८७ हेक्‍टर क्षेत्रावर नागली हे पीक घेतले होते. म्हणजेच खरिपातील एकूण पेरणीच्या ९० टक्के क्षेत्रावर भातपीक घेतले गेले.धरणे आहेत; पण...

ठाणे जिल्ह्यात भातसा, तानसा, वैतरणा व बारवी ही मोठी धरणे असून अन्य छोटे बंधारे आहेत. परंतु त्या पाण्याचा शेतीसाठी फारसा उपयोग होत नसल्याने शेतीव्यवसाय बहरला नाही.

ठाणे जिल्ह्यातील शेतीला घरघर लागली आहे. शेतकऱ्यांची मुले राजकारण, स्थानिक कुरघोडी व अन्य बाबींमध्ये गुंतली आहेत. वाढत्या शहरीकरणात जमिनीला सोन्याचा भाव आल्याने शेतजमीन विकून पैसा मिळवण्याकडे त्याचा कल आहे. वडिलोपार्जित शेती हे भांडवल आहे, याचा त्यांना विसर पडला आहे,

- किसन कथोरे, आमदार.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, खते, बियाणे व कीटकनाशके देण्यात येतात. या वर्षात जिल्ह्यात बायोगॅस यंत्रे देण्यात येणार आहेत.
- अर्चना आखाडे, कृषी विकास अधिकारी. 

Web Title: Thane district's farming issue