दिव्याचे सिंगापूर नाही, वासेपुर करून ठेवले आहे - आमदार राजू पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Raju Patil

दिवा शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्याचा आमच्या नगरसेवकांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. दिव्याचे सिंगापूर करायचे आहे, पण कोणतीही गोष्ट लगेच होत नाही.

Thane News : दिव्याचे सिंगापूर नाही, वासेपुर करून ठेवले आहे - आमदार राजू पाटील

ठाणे - दिवा शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्याचा आमच्या नगरसेवकांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. दिव्याचे सिंगापूर करायचे आहे, पण कोणतीही गोष्ट लगेच होत नाही असे वक्तव्य दिवा येथे ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एका कार्यक्रमात केले. या वक्तव्यावरून मनसे आणि भाजपाने बाळासाहेबांची शिवसेनेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दिव्याचे सिंगापूर नाही, वासेपुर करून ठेवले आहे असे बोल मनसे आमदार राजू पाटील यांनी सेनेला सुनावले आहेत. तर भाजपाचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सिंगापूर नको तर ठाण्यासारखा विकास करा असे म्हणत सेनेचे कण खेचले आहेत. राज्यात भाजपा शिंदे गटाची युती आणि मनसेचा पाठिंबा असला तरी दिव्याच्या विकासावरून मात्र तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना ट्रोल करत आहेत.

दिवा येथे आयोजित एका कार्यक्रमात ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिव्याचे सिंगापूर करायचे आहे, पण त्यासाठी वेळ लागेल असे वक्तव्य केले होते. या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते म्हणाले, दिव्याचा विकास झपाट्याने होत आहे. प्रत्येक वर्षी दिव्याच्या विकासामध्ये काही ना काही भर पडत आहे. आमचे नगरसेवक प्रामाणिकपणे दिव्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पूर्वीचा दिवा स्टेशन परिसर त्याच्यामध्ये दातिवली हा सर्व परिसराला आणि त्याच्यामध्ये झालेला अमुलाग्र बदल हा बदल केवळ शिवसेनेमुळे झालेला आहे.आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, रमाकांत मढवी आणि त्याच्यासोबत असणारे सर्व नगरसेवक यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत, म्हणून दिव्याचा विकास झपाट्याने होत आहे.टीका करणारे करत असतात. सगळ्याच गोष्टी ताबडतोब होत नसतात. आम्हाला सुद्धा सिंगापूर बनवायच आहे, परंतु सिंगापूर लगेच बनू शकत नाही.दिव्यामध्ये प्रचंड प्रमाणात वस्ती वाढते, रोज लोक या दिव्यामध्ये वाढत आहेत. परंतु पाणी असेल, लाईट असेल, रस्ते असेल या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, हे सर्व नगरसेवक तुमच्यासाठी प्रामाणिकपणे झटत आहे.

या भाषणाचा व्हिडीओ समाज माध्यमातून प्रचंड व्हायरल होत असून यावर आता मनसे, भाजपाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सिंगापूर नाही वासेपुर करून ठेवले आहे -

मनसे आमदार राजू पाटील यावर म्हणाले, खूप हास्यास्पद बोललेले आहेत ते. माझे मित्र नरेश म्हस्के हे ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते. ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी हे दिव्यात राहतात. त्यांनी काय दिवे लावले हे त्यांना दिसले असेल. दिव्याचे सिंगापूर करायच्या वार्ता करतात हे लोक. सिंगापूर येथे कचरा प्रकल्पात तयार होणाऱ्या खतावर गार्डन तयार केले गेले आहे. आमच्या दिव्यात काय तर हे कचरा आणून टाकतात. हे काय दिव्याचे सिंगापूर करणार दिव्याचे यांनी वासेपुर करून टाकले आहे. आणि यांची जी गँग आहे ती अजूनही दिवा ओरबडण्याचे काम करत आहेत. दिव्याच्या माणसानं गृहीत धरून की दिव्याचे आम्ही सिंगापूर करू मग तुम्ही आम्हाला मत द्या हे त्यांनी आता विसरावे. लोक आता काही मूर्ख राहिलेली नाहीत यावेळेस दिवेकर काय धडा द्यायचा तो देतील.

सिंगापूर नको ठाण्यासारखा विकास करा - भाजप शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे

नरेश मस्के यांच डोकं ठिकाणावर आहे का? दोन दिवसांपूर्वी ते दिव्यामध्ये मध्ये आले होते.तेथे दिव्याला आम्ही सिंगापूर करू सांगितले परंतु मला वाटतं ते दिव्यात येत असताना त्या रस्त्यात डम्पिंगचा धूर त्यांच्या नाकात गेला असेल आणि त्या धुराची नशा त्यांना झाली असेल आणि त्या नशेत त्यांनी हे वक्तव्य केलं असेल,अहो तुम्ही दिव्याचा सिंगापूर करणार पण तिथे मराठी माणूस राहणार का? हा मोठा प्रश्न आहे साहेब आमच्या दिव्याचं सिंगापूर नका करू ठाण्यासारखंच आमचा दिवा करा हीच आमची प्रामाणिक मागणी आहे हवं तर तुम्ही तुमचा ठाण्याला सिंगापूर करा पण ही खोटी आश्वासन दिवेकरांना देणं बंद करा, असे मुंडे म्हणाले.