ठाणे अग्निशमन दलाची धुरा स्थानक अधिकाऱ्यावर 

दीपक शेलार
रविवार, 8 डिसेंबर 2019

ठाण्याची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास पोहचली असताना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील "उपमुख्य अग्निशमन अधिकारी' पद गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या दुर्घटनेशी दोन हात करण्यासाठी किंबहुना अग्निशमन दलाच्या कामकाजाचा गाडा सुरळीतपणे हाकता यावा, यासाठी उपमुख्य अग्निशमन अधिकारी पदाची धुरा तूर्तास बाळकूम केंद्राच्या स्थानक अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे.

ठाणे : वाढत्या नागरीकरणाबरोबरच ठाणे शहरात टोलेजंग इमारतींची संख्या वाढत आहे. आजघडीला ठाण्याची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास पोहचली असताना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील "उपमुख्य अग्निशमन अधिकारी' पद गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या दुर्घटनेशी दोन हात करण्यासाठी किंबहुना अग्निशमन दलाच्या कामकाजाचा गाडा सुरळीतपणे हाकता यावा, यासाठी उपमुख्य अग्निशमन अधिकारी पदाची धुरा तूर्तास बाळकूम केंद्राच्या स्थानक अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे.
 
मुंबईच्या सीमेवर असलेल्या ठाणे शहरात माजिवडा, घोडबंदर रोड, वर्तकनगर, खारेगाव, मुंब्रा, शिळफाटा आदी ठिकाणी टोलेजंग इमारती झपाट्याने उभ्या राहत आहेत. ठाणे स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असल्याने, पालिकेने अग्निशमन दलाच्या सक्षमतेवर भर दिला आहे. पालिका क्षेत्रातील 20 लाख लोकसंख्येसाठी जवाहर बाग, कोपरी, पाचपाखाडी, वागळे, बाळकूम, मुंब्रा आणि रुस्तुमजी ही सात अग्निशमन केंद्रे आहेत.

नागरीकरण वाढत असल्याने दिवा, शिळ, पारसिक, माजिवडा, ओवळा आणि आनंदनगर या ठिकाणीही अग्निशमन केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, अग्निशमन दलात महत्त्वाचे पद असलेल्या उपमुख्य अग्निशमन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ मुहूर्त मिळालेला नाही. 

उपमुख्य अग्निशमन अधिकारीपदी अरुण राऊत हे 30 जून 2018 रोजी निवृत्त झाल्यानंतर काही महिने हे पद रिक्तच होते. त्यानंतर 8 मार्च 2019 ला विभागीय अधिकारी रतन परदेशी यांच्याकडे या पदाचा प्रभार सोपवण्यात आला. परदेशी 31 मे 2019 ला सेवेतून निवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. सद्यस्थितीत या पदाची धुरा बाळकूम अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी मुनीरशेख मुल्ला या अधिकाऱ्याकडे सोपवली आहे.

त्यामुळे स्थानक अधिकाऱ्यासह अग्निशमन मुख्यालयातील कारभार आणि त्याच्याच जोडीने नियमित येणाऱ्या तक्रारी व जनमाहिती अधिकारीपदाची जबाबदारीही मुल्ला याच अधिकाऱ्याला पेलावी लागत आहे. त्यामुळे शहरात एखादी मोठी दुर्घटना अथवा आपत्ती ओढवल्यास सक्षम अधिकाऱ्याची वानवा भासू शकते, अशी चर्चा नागरिक करीत आहेत. 

यंत्रणा मुबलक, मनुष्यबळ तुटपुंजे 
आजघडीला ठाणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक हायड्रोलिक लेडर, ब्रेंटो लिफ्ट, टर्न टेबल लेडर, कंट्रोल व्हॅन आहेत. त्याचबरोबर 12 फायर टेंडर, 6 रेस्क्‍यू टेंडर, 10 वॉटर टॅंकर, 8 रेस्क्‍यू व्हॅन आणि 6 फायर दुचाकी अशी यंत्रणा असून, पाईपची देखभाल करणारी होज मशीन, 90 मीटर उंचीची शिडी व 6 फायर फायटिंग वाहनेही आहेत.

त्यामुळे अग्निशमन यंत्रणा मुबलक असली तरी अग्निशमन दलात मुख्य अधिकाऱ्यासह 26 अधिकारी, 200 फायरमन, 24 (तांडेल) लीडिंग फायरमन, 83 रेस्क्‍यू फायरमन आणि टीडीआरएफचे 11 अधिकारी-कर्मचारी एव्हढेच तुटपुंजे मनुष्यबळ असल्याचे समोर आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Fire brigade charge on station officer