ठाण्यातील रुग्णालये संपावर गेल्यावर करायचे काय? 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 April 2018

ठाणे - ठाण्यातील रुग्णालयांची नोंदणी करण्यासाठी त्यांना अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. ही एनओसी नसल्यास रुग्णालयांची नोंदणी करण्यात येत नसल्यामुळे भविष्यात या रुग्णालयांनी संप पुकारला तर काय करायचे, असा प्रश्‍न सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी (ता.13) सर्वसाधारण सभेत उपस्थित केला; मात्र कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी प्रशासन परस्पर करीत नसून अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र घेणे उच्च न्यायालयाने बंधनकारक केले असून त्यानुसारच महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही कारवाई केली असल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी दिली. 

ठाणे महापालिका परिसरात अनेक रुग्णालयांना चेंज ऑफ युजर्सचे दर आकारण्यात आले आहेत. आकारण्यात आलेले शुल्क लाखोंच्या घरात आहेत. अशा वेळी छोट्या प्रमाणात असलेले रुग्णालय हे शुल्क कसे भरणार, असा प्रश्‍न सभागृह नेते म्हस्के यांनी विचारला. मूळात एवढी वर्षे आपण त्यांची नोंदणी करून घेत होतो, तेव्हा त्यांची नोंदणी सुरळीत होत होती. आताच विविध नियमांची सक्ती का, असा प्रश्‍न त्यांनी केला. अग्निशामक दल आणि आरोग्य विभागांच्या सक्तीपायी उद्या रुग्णालयांनी बंद पुकारला, तर काय होईल, याचा विचार करा, असा इशारा या वेळी त्यांनी दिला. याला उत्तर देताना मुख्य अग्निशामक अधिकारी शशिकांत काळे म्हणाले, रुग्णालयाच्या विषयावर महापालिका आयुक्तांनी बैठक बोलावली आहे. त्यामध्ये यावर सविस्तर चर्चा करता येईल. 

मुख्य आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे म्हणाले, मुंबई उच्च न्ययालयात ठाण्यातील रुग्णालयाच्या अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीबाबत याचिका दाखल असून त्यात ठाण्यातील रुग्णालयात नियम पाळले जात नाहीत, असे म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने याबाबत आदेश दिले असून याबाबत शपथपत्रही दाखल केले आहे. 

उत्पन्नाच्या दाखल्याचा आग्रह 
ठाणे महापालिकेतर्फे खेवरा सर्कल येथे उभारलेल्या डायलेसिस सेंटरमध्ये तीन महिन्यांत केवळ एकाच रुग्णावर उपचार झाल्याचा गौप्यस्फोट माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांनी केला. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाकडे केशरी, पिवळे रेशन कार्ड असतानाही त्यांच्याकडे तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला मागितला जात असल्याचे मोकाशी यांनी सांगितले. मुख्य आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी रेशनकार्ड असल्यावर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत त्यांना उपचार दिले जातील, असे सांगितले. त्याच वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी सर्व डॉक्‍टरांच्या पदवीचा फेरआढावा घेण्याची मागणी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane hospitals are on strike