Thane News : ठाण्यात राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होतोय ?आव्हाडांचा रोख कुणाकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane News

Thane News : ठाण्यात राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होतोय ? आव्हाडांचा रोख कुणाकडे

ठाणे - ठाण्यातील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात चेहऱ्यावर हसूनखेळून असणाऱ्या शिंदे विरुद्ध आव्हाड यांच्यातला अंतर्गत संघर्ष आपण पाहिला. त्या संघर्षानं आता इतकी पाळंमुळं रोवली आहेत, की मागील २ दिवसांपासून ठाण्यातील राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता खुद्द आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. आणि यावेळी त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, तेच जाणून घेऊयात या लेखातून..

सुरुवातीला शिंदे विरुद्ध आव्हाड संघर्षाची सुरुवात कुठून झाली ते समजून घेऊया

तर नोव्हेंबर महिन्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात ७२ तासात २ गुन्हे दाखल झाले. पहिला म्हणजे चित्रपटगृहात प्रेक्षकाला झालेल्या मारहाणीवरुन तर दुसरा म्हणजे थेट कलम ३५४ चा. तोही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हजेरीतील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमावेळी. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.

याचवेळी आव्हाडांनी एका महिलेला बाजूला केलं. पण या महिलेनं नंतर थेट पोलिसात विनयभंगाची तक्रार दिली आणि पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा नोंद केला. नंतर तक्रारदार महिला भाजपा पदाधिकारी असल्याचं लक्षात आलं. आणि त्यापुढे झालेला संपूर्ण राजकीय घटनाक्रम महाराष्ट्रानं पाहिला.

आणि इथूनच शिंदे विरुद्ध आव्हाड संघर्षाची सुरुवात झाली असं म्हणता येईल जितेंद्र आव्हाडांनी भले थेट नाव घेतलं नसलं तरी ठाण्यात राष्ट्रवादी फोडण्यासाठी खोके वाटत असल्याचा आरोप केलाय.

याविषयी आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय ते वाचूया

माझा बंधुतुल्य सहकारी जितू पाटील जो मागच्या निवडणूकीत निवडून आला होता; त्याला वेगवेगळी आमिष दाखवून पैसेवाल्यांच्या सेनेत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे . त्यासाठी बटलू गद्दार हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता मोरयासारखे जाऊन तिथे ४-४ तास त्याच्या घरी बसाल, तर तो काय घरातून हाकलून देईल.

पण आपण किती वेळ कोणाच्या घरी बसावं याची तर लाज बाळगा. लोचटासारखे किती वेळ बसाल. सगळेच धंदा करायला बसलेत आणि स्वतःचा विक्रीचा रेट लावतायेत असे समजू नका. काही स्वाभिमानी माणसंसुद्धा या जगात जिवंत आहेत. पैशाने सगळ्यांनाच विकत घेता येतं हा डोक्यातला भ्रम काढून टाका.

जितू पाटील हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक आहे. त्याला राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यासाठी पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. विशेष म्हणजे २ दिवसांपूर्वीही आव्हाडांनी यासंदर्भात एक सूचक ट्विट केलं होतं.त्यात त्यांनी म्हटलेलं "पैसेवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला १ कोटी देतो,

तुझ्या पत्नीला १ कोटी देतो अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामं देतो" ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धतअशा शब्दात आव्हाडांनी थेट नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर घणाघाती आरोप केला आहे. तर आव्हाडांच्या या आरोपावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते वाचूया.

"अनेक ठिकाणी मुख्य पक्ष फोडून अनेकांना दुसरीकडे घेऊन जात आहेत. पण याचा फारसा विचार करायचा नसतो. लोकप्रतिनिधी फोडण्याची पावलं शिंदे गटाकडून जास्त दिसत आहेत. पण हे घडत असतं, त्याची जास्त काळजी घेण्याची गरज नाही”असं खुद्द पवारांनी म्हटलंय.

तर तिकडे शिंदे गटासोबत वैरत्व वाढत असतानाच ठाकरेंशी आव्हाड जवळीक वाढताना दिसतेय. कारण २६ जानेवारीला ठाण्यातील ठाकरे गटाकडून आयोजित आरोग्य शिबिरालाही उद्धव ठाकरेंच्या शेजारीच जितेंद्र आव्हाड मंचावर दिसून आले. यावेळी आव्हाड ठाकरेंच्या चांगलंच पुढे पुढे करत होते.

तरी, शिंदे गटावर आमदारांनंतर आता येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक खरेदीचा आरोप होतोय. यावर शिंदे गटाकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्वाचं आहे.