अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्यांचा महासभेतील आवाज 'म्यूट'! नारायण पवार यांचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

ठाण्यातील भाजपा नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप 

ठाणे, ता.20 : सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका प्रशासनाच्या दृष्टीने अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्या नगरसेवकांचा आवाज ठाणे महापालिकेच्या वेबिनार महासभेत `म्यूट' केला जात होता, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आज केला. या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश देणाऱ्या पदाधिकारी वा अधिकाऱ्याचे नाव नागरिकांसमोर जाहीर करावे. तसेच महासभांच्या कामकाजाचे चित्रिकरण वेबसाईटवर जारी करावे, अशी मागणीही  पवार यांनी केली आहे.

ठाणे महापालिकेची दुसरी वेबिनार महासभा 18 सप्टेंबरला झाली. यापूर्वी 8 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या वेबिनारसभेप्रमाणेच या सभेचेही कामकाज अनाकलनीय होते. या सभेत काही विशिष्ट नगरसेवकांचा आवाज पद्धतशीरपणे ‘म्यूट’ करण्यात आला. एखादा मुद्दा अडचणीचा असल्याचे वाटल्यानंतर, संबंधित विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकाचा आवाज बंद केला जात होता. महापौर म्हणून आपण सभेच्या अध्यक्षस्थानी होतात, या प्रकाराची आपण चौकशी करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.

महत्त्वाची बातमी आठवड्यात दुसऱ्यांदा शिवसेनेने दुसऱ्यांदा केलं मोदी सरकारच्या विधेयकांचे स्वागत

कोरोना केंद्र आणि क्वारंटाईन सेंटरसाठी करण्यात आलेल्या अनिर्बंध खरेदीविरोधात महासभेत प्रशासनाला विचारणा करण्यात येणार होती. मात्र, याबाबत मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पद्धतशीरपणे आवाज `म्यूट' करण्यात आला. अनिर्बंध आणि अवाजवी दराने केलेल्या खरेदीला आपला आशीर्वाद असल्याचे  समजायचे का, असा सवालही नगरसेवक पवार यांनी विचारला आहे. 

आयटी कर्मचाऱ्यांची चौकशी करावी

या महासभेवेळी म्यूट करण्याचे अधिकार असलेल्या आयटी विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. तसेच या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश देणाऱ्या पदाधिकारी वा अधिकाऱ्याचे नाव जनतेसमोर जाहीर करावे, अशा मागण्या नारायण पवार यांनी केल्या आहेत.

( संपादन -  सुमित बागुल  ) 

thane municipal corporation narayan pawar online mahasabha IT team


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane municipal corporation narayan pawar online mahasabha IT team