ठाणे पालिकेची कचरा कोंडी कायम

राजेश मोरे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

ठाणे शहराला वारंवार उद्‌भवणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन आमदार एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करून दिवा शहराजवळील वनविभागाच्या परिसरातील खदान डम्पिंगसाठी मंजूर करून घेतली होती. त्यावेळी एक वर्षात या खदानीत कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा दावा केला जात होता. पण या खदानीमध्ये कचरा टाकण्याचा निर्णय अद्याप वनविभागाच्या लालफितीत अडकल्याचा दावा केला जात आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेसमोर डम्पिंग ग्राऊंडची समस्या कायम आहे. पालिकेचे कचरा डम्पिंग अद्यापही खासगी जागेत सुरू असून चार वर्षापूर्वी खासगी मालकाने नकार दिल्यानंतर ठाण्यातील रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळाले होते. या समस्येनंतर दिवा येथील खासगी जागेत कचरा टाकण्यास परवानगी मिळाल्याने डम्पिंगची समस्या काही प्रमाणात मिटली. पण त्यामुळे पालिकेने डम्पिंगसाठी मिळालेल्या वनविभागाच्या हद्दीतील खदानीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. मात्र, या खदानीमध्ये कचरा टाकण्याचा निर्णय अद्याप वनविभागाच्या लालफितीत अडकल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

ठाणे शहराला वारंवार उद्‌भवणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन आमदार एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करून दिवा शहराजवळील वनविभागाच्या परिसरातील खदान डम्पिंगसाठी मंजूर करून घेतली होती. त्यावेळी एक वर्षात या खदानीत कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा दावा केला जात होता.

एवढेच नव्हे तर सुमारे दहा वर्षानंतर कचरा टाकून ही खदान कचऱ्याने भरून गेल्यानंतरही तेथे आकर्षक उद्यान साकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या खदानीमध्ये कचरा टाकण्याचा निर्णय अद्याप वनविभागाच्या लालफितीत अडकल्याचा दावा केला जात आहे. नागपूर येथील वनविभागाकडून या खदानीत कचरा टाकण्याला परवानगी देण्यासाठी केंद्राच्या वनविभागाकडे साकडे घालण्यात आले आहे. पण गेले तीन वर्षे केवळ "तारीख पे तारीख' सुरू असल्याने या खदानीत शास्त्रोक्त पद्धतीने कचरा टाकण्याचा निर्णय कागदावरच राहिला आहे. 

महापालिकेच्या वतीने हिरानंदानी येथे 35 टन, श्रीरंग सोसायटी येथे 10 टन कचरा विल्हेवाटीचे प्रकल्प उभारले जात आहेत. यामध्ये संबंधित गृहसंकुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. अशाप्रकारे लहान-मोठे सुमारे शंभर टनावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सध्या ठाणे शहरात कार्यरत झाले आहेत. मात्र डम्पिंग ग्राऊंडचा विषय "आ वासून' उभा राहिलेला नसल्यानेच वनविभागाच्या हद्दीतील खदानीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे कळते. 

दररोज 700 टन कचरा 
आजच्या घडीला ठाणे शहरात दिवसाला सुमारे 700 टन कचरा दररोज जमा होतो. महापालिकेकडून कितीही दावा केला जात असला तरी शंभर एक टन कचऱ्याचा अपवाद वगळता सर्व कचरा हा डम्पिंग ग्राऊंडवर पाठविला जातो. पण सध्या ज्या डम्पिंग ग्राऊंडवर हा कचरा पाठविला जातो, ती जागा खासगी मालकाची आहे. या खासगी मालकाला कचऱ्याच्या माध्यमातून त्याच्या जागेची भरणी करून मिळतेच पण त्याचवेळी पालिकेने येथे कचरा टाकण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात मोबदलाही मिळतो. त्यामुळे गेल्या आठवड्यात या दिवा डम्पिंगच्या संबंधित विषय सर्वसाधारण सभेत तहकूब करण्यात आला होता. 

खदानीमध्ये कचरा टाकण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. त्यासाठी नागपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात आपले अधिकारी दोन वेळा प्रत्यक्ष गेलेले आहेत. त्यानंतरही महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे. नागपूर येथून केंद्राकडे याबाबत परवानगी मागण्यात आली आहे. केंद्राकडून परवानगी मिळाल्यानंतर राज्यातील वनविभागाकडून त्याची परवानगी मिळणार आहे. याबाबत आमचा पाठपुरावा सुरू असून पुढील दोन महिन्यात ही परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे. 
- मनीष जोशी, 
उपायुक्त, ठाणे पालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane municipality Dumping issue remains