ठाणे पालिकेचे शुद्ध पाणी गटारात 

दीपक शेलार
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीतील शुद्ध पाणी चक्क गटारात वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचपाखाडी सर्व्हिस रोडवरील धर्मवीर मार्गावर अवघ्या काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या शुद्ध जलवितरण प्रकल्पाच्या भूमिगत जलवाहिनीतून पाणी गळती होऊन हे शुद्ध पाणी गटारात वाहून जात आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होत असून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू आहे. 

ठाणे : "जल है तो कल है... पाणी वाचवा' आदी घोषणा सातत्याने करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीतील शुद्ध पाणी चक्क गटारात वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचपाखाडी सर्व्हिस रोडवरील धर्मवीर मार्गावर अवघ्या काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या शुद्ध जलवितरण प्रकल्पाच्या भूमिगत जलवाहिनीतून पाणी गळती होऊन हे शुद्ध पाणी गटारात वाहून जात आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होत असून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू आहे. 

ठाणे शहराचे नागरीकरण वाढत असल्याने पायाभूत सुविधांसह पिण्याच्या पाण्याची गरजदेखील महापालिकेने भागवणे गरजेचे आहे. पालिकेकडे स्वतःचे धरण नसल्याने पाण्यासाठी दुसऱ्या प्राधिकरणावर विसंबून राहावे लागते. पालिकेचे प्राधिकरण असलेल्या स्टेम, बृहन्मुंबई महापालिका पाणीपुरवठा आणि एमआयडीसीच्या वतीने शहराला पाणीपुरवठा केला जातो. यातील पाचपाखाडी आणि हाजुरी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बृहन्मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतील पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मोहीम मध्यंतरी ठाणे महापालिकेने राबवली. 

त्यानुसार 2 ऑगस्ट 2019 रोजी पाचपाखाडी येथील गुरुकुल सोसायटी सर्व्हिस रोड, धर्मवीर मार्ग येथे राज्याचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कच्च्या पाण्याचे "पाणी संयोजन' शुद्ध पाण्याच्या जलवाहिनीवर स्थलांतरित करण्यात आले होते. या भूमिगत जलवाहिनीला जोडलेल्या यंत्रणेद्वारे ठाणेकर नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याच ठिकाणी जलवाहिनीमधून पाणीगळती सुरू असून हे पाणी चक्क गटारात वाहून जात असल्याचे समोर आले आहे. 

यामुळेच गळती... 
मध्यंतरी गढूळ पाणी येत असल्याने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेमार्फत सुरू असताना जेसीबीचा फटका बसल्याने भूमिगत महानगर घरगुती गॅस वाहिनीदेखील फुटली होती. गॅस वाहिनीमधून उंचच उंच गॅसचे फवारे उडू लागल्याने तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम आटोपते घेण्यात आले होते. कदाचित तेव्हापासून जलवाहिनीची गळती सुरूच राहिली असावी. त्यामुळे फुटलेल्या जलवाहिनीतील पाणी वाहून शुद्ध पाणी थेट गटारात वाहत असावे, अशी माहिती स्थानिक आणि पहाटे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी दिली. 

पाचपाखाडी धर्मवीर मार्गावरील या प्रकल्पाच्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही पुन्हा कुठे गळती असेल तर पाहणी करून तातडीने दुरुस्ती केली जाईल. 
- वामन सखदेव, जलअभियंता, ठाणे पालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane municipalitys pure water goes in Gatar