बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मयत जगदीश उर्फ जग्गू वर्मा व्यवसायाने बिल्डर होता.वर्मा दाम्पत्याला दोन मुले आहेत.नोव्हेंबर,2013 मध्ये जगदीश मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर हरवल्याची तक्रार त्याच्या पत्नीने वर्तकनगर पोलिसात दिली होती.

ठाणे : ठाण्यातील बिल्डर जगदीश उर्फ जग्गू वर्मा हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.आर.कदम यांनी सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली.आरोपी मृत वर्माची पत्नी सोनल (वय 36) आणि तिचा कथित प्रियकर संतोष सिंग (वय 39) व त्याचे दोन साथीदार यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याने एकही ठोस पुरावा न्यायालयात सादर करू शकले नाहीत.अशी माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली.

मयत जगदीश उर्फ जग्गू वर्मा व्यवसायाने बिल्डर होता.वर्मा दाम्पत्याला दोन मुले आहेत.नोव्हेंबर,2013 मध्ये जगदीश मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर हरवल्याची तक्रार त्याच्या पत्नीने वर्तकनगर पोलिसात दिली होती. त्यानंतर काही दिवसातच जग्गूचा मृतदेह शहापूर पोलिसांना एका गोणीत कोंबलेल्या अवस्थेत भातसा नदीपात्रात आढळल्याने पत्नीचा बनाव उघड झाला होता.दरम्यान, या हत्येप्रकरणी शहापूर पोलिसांनी मयताची पत्नी सोनल वर्मा आणि तिचा सहकारी संतोष सिंग यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली होती.या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होती.या खटल्यात सरकारच्या बाजूने जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी युक्तिवाद करताना या हत्येत अन्य आरोपीसह सोनलचा प्रियकर संतोष सिंग याचाही सहभाग असल्याचे न्यायलयासमोर मांडले.सोनल हिचे 15 वर्षापासून आणि विवाहानंतरही संतोष याच्याशी प्रेमप्रकरण सुरु होते. या अनैतिक संबंधाची माहिती जगदीश याला मिळताच त्याने सोनलला त्रास देण्यास सुरुवात केली.त्यामुळे सोनल घटस्फोट मागत होती. मात्र,जगदीशने नकार दिल्याने सोनल,संतोष सिंग आणि त्याच्या गारमेंटमध्ये काम करणारे महेश भडकमकर व कुलदीप पोखरकर आदींनी संगनमताने घरातच जगदीशची हत्या करून त्याचा मृतदेह कारमधून भातसा नदीत फेकल्याचे न्यायालयासमोर मांडले. मात्र,या घटनाक्रमात आवश्यक असलेले सबळ पुरावे किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायलयात सादर करण्यात पोलिसांना अपयश आले.दुसरीकडे आरोपीचे वकील गजानन चव्हाण आणि अनुराधा परदेशी यांनी मात्र खुनाच्या गुन्ह्यात आरोपींचा सहभाग नसल्याचा जोरदार युक्तिवाद केल्याने  न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता करण्याचा निर्णय दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane news builder jagdish verma murder case