महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय अखेर तिला न्याय 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 November 2017

ठाणे - जुलै महिन्यात झाड अंगावर पडून मृत्यू झालेल्या किशोर पवार यांच्या पत्नीला अखेर ठाणे महापालिकेत लिपिक या पदावर नोकरी मिळणार आहे. याबाबत सामाजिक संस्थांनी जनआंदोलन पुकारल्यानंतर महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनीही आवाज उठविला होता. त्यानुसार पवार यांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतचा प्रस्ताव आता येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. 

ठाणे - जुलै महिन्यात झाड अंगावर पडून मृत्यू झालेल्या किशोर पवार यांच्या पत्नीला अखेर ठाणे महापालिकेत लिपिक या पदावर नोकरी मिळणार आहे. याबाबत सामाजिक संस्थांनी जनआंदोलन पुकारल्यानंतर महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनीही आवाज उठविला होता. त्यानुसार पवार यांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतचा प्रस्ताव आता येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. 

ठाण्यात पाचपाखाडी येथे 21 जुलैला ऍड. किशोर पवार यांच्यावर झाड पडून ते जखमी झाले होते. दुसऱ्या दिवशी 22 जुलैला उपचार सुरू असताना त्यांचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व वृक्ष अधिकारी यांच्या हलगर्जीमुळे हा मृत्यू झाल्याने किशोर यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने केली होती. त्यासाठी मागील दोन महिन्यांपासून लोकशाही मार्गाने विविध आंदोलने झाली. विविध मोर्चे काढण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर थांबून नगरसेवकांना पत्रके वाटून त्यांनी पवार कुटुंबीयांच्या प्रश्‍नावर महासभेत वाचा फोडावी, याकरिता विनंती करण्यात आली होती. माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, सभागृहनेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, हणमंत जगदाळे, नगरसेविका रुचिता मोरे यांनीही वेळोवेळी ही मागणी केली होती; मात्र प्रशासनाने पवार यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार होता. त्यांच्या पत्नीच्या नोकरीबाबत काहीच ठोस असा निर्णय घेण्यात येत नव्हता. परिणामी ठाणे मतदाता जागरण अभियानाने या प्रस्तावाच्या विरोधात महापालिका मुख्यालयाजवळ आंदोलन केले. 

शैक्षणिक अर्हतेनुसार  लिपिकपदावर नियुक्ती 
गेल्या महासभेत किशोर पवार यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला. तेव्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने आवाज उठवल्यानंतर अखेर आयुक्तांनी पवार यांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी देण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव मान्य केला. त्यानुसार आता याबाबतचा प्रस्ताव त्वरित तयार करून येत्या 22 नोव्हेंबरच्या महासभेत तो मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावानुसार किशोर पवार यांच्या पत्नी प्रीती पवार यांची त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार लिपिकपदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane news TMC