esakal | खळबळजनक! ठाण्याच्या वेदांता हॉस्पिटलमध्ये चौघांचा अचानक मृत्यू

बोलून बातमी शोधा

खळबळजनक! ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये चौघांचा अचानक मृत्यू

चार रूग्णांच्या मृत्यूमागचं खरं कारण तपासण्यासाठी समितीची स्थापना

खळबळजनक! ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये चौघांचा अचानक मृत्यू
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसतोय. राज्यातील रुग्णसंख्या वाढ ही ज्या वेगाने होतेय, त्या वेगाने वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं काम केलं जात नसल्याची भावना राज्यातील जनतेच्या मनात आहे. गेल्या काही दिवसात कोविड हॉस्पिटल्स आणि इतर रूग्णालयातील आगीच्या प्रकरणात अनेकांना नाहक जीव गमवावा लागला. ही प्रकरणं ताजी असतानाच आज ठाण्यातील वर्तकनगर परिसरात असलेल्या वेदांत या कोविड रुग्णालयात चौघांचा अचानक मृत्यू झाल्याची खळबळजनक गोष्ट घडली. या मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, पण वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे रूग्ण दगावल्याची चर्चा रंगली आहे.

ठाण्यातील वर्तकनगरमध्ये वेदांत हे खाजगी कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात आज सकाळी अचानक चार रुग्ण दगावले. या रूग्णांची प्रकृती ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने बिघडली आणि परिणामी या रुग्णांचा मृत्यू झाला असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जातोय. ऑक्सिजन न मिळाल्याने आपलं माणूस गमावल्यामुळे नातेवाईक संतप्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. "वेदांत हॉस्पिटलमधील चार रूग्ण आज सकाळी दगावले. रूग्णांच्या मृत्यूचे नक्की कारण काय याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका समिती तयार करण्यात तयार करण्यात आली आहे", अशी माहिती ठाणे महानगर पालिका प्रशासनाने दिली.

भाजप आमदार निरंजन डावखरे घटनास्थळी आले आणि त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. दगावलेले चारही रुग्ण हे अत्यवस्थ होते अशी माहिती निरंजन डावखरे यांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असं सांगण्यात आलं.

या खळबळजनक प्रकारानंतर रूग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या खालच्या बाजूस गर्दी केली. रूग्णांच्या नातेवाईकांसह मनसे आणि भाजपचे पदाधिकारी देखील येथे दिसले. त्यामुळेच रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. अचानक झालेल्या या मृत्यूनंतर आता मृत रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचाराचे बिले घेऊ नये, अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. तर मनसे नेत्याने या मृत्यूंची चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. जे घडलं ते दुर्दैवी असून या घटनेत काही चुकीचं असल्यास चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.