Loksabha Election : शेवटच्या टप्प्यांत शिवसेनेचा कस लागणार ; मुंबईतील वर्चस्वासाठी लढाई,नऊ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

देशात भाजप व मित्रपक्षांनी ४०० लोकसभा जागा जिंकण्याचा जरी नारा दिला असला तरी राज्यात मात्र महायुती अडखळताना दिसत आहे. महायुतीला महाविकास आघाडी तोडीसतोड उत्तर देताना दिसत आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी शिवसेनेपासून फुटून वेगळ्या झालेला शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना अस्तित्व दाखवण्यासाठी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्नाची शर्थ करत आहे.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

मुंबई : देशात भाजप व मित्रपक्षांनी ४०० लोकसभा जागा जिंकण्याचा जरी नारा दिला असला तरी राज्यात मात्र महायुती अडखळताना दिसत आहे. महायुतीला महाविकास आघाडी तोडीसतोड उत्तर देताना दिसत आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी शिवसेनेपासून फुटून वेगळ्या झालेला शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना अस्तित्व दाखवण्यासाठी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्नाची शर्थ करत आहे. पहिल्या तीन टप्प्यात सहा मतदासंघांत शिवसेना निवडणुकीला सामोरे गेला असला तरी उर्वरित दोन टप्प्यांमध्ये आपल्या नऊ उमेदवारांच्या भवितव्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे. एकुणातच एकनाथ शिंदे यांची कस लागणार आहे.

पहिल्या तीन टप्प्यात शिंदे यांच्या शिवसेनेच्या सहा उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात जमा झाले असले तरी अजूनही त्यांच्या गटाच्या तब्बल नऊ उमेदवारांचे भवितव्य चौथ्या व पाचव्या टप्प्यात ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात रामटेक, दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ-वाशिम, हिंगोली, बुलढाणा तर तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले या जागा शिंदे गटाने लढवल्या आहेत. तर येणाऱ्या चौथ्या व पाचव्या टप्प्यामध्ये संभाजीनगर, मावळ, शिर्डी, मुंबईमधील तीन जागा, ठाणे, कल्याण, नाशिक या जागा शिंदे यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत.

शिवसेनेतील फुटीनंतर शिर्डी मतदारसंघात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ अशी लढत आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्याचवेळी शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस फुटीनंतर या मतदारसंघातील राजकीय बदल झालेला दिसून येतो. या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यासमोर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाऊसाहेब वाकचौरे यांचे आव्हान असतानाच वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते याही अत्यंत महत्वाच्या उमेदवार आहेत. या मतदारसंघात लोखंडे यांनी गेल्या पाच वर्षात मतदारांपासून राखलेले अंतर हा चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

Loksabha Election
Sharad Pawar : ‘मविआ’ला ३० ते ३५ जागा मिळतील ; निवडणुकीच्या तीन टप्प्यांनी पंतप्रधान मोदी अस्वस्थ

त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये शेवटच्या क्षणी महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेले रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांना ही लढत तशी सोपी नाही. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे तर ‘एआयएमआयएम’चे विद्यमान खासदार इम्तियाज जलिल यांचे तगडे आव्हान उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या पक्षांसमोर असणार आहे. चंद्रकांत खैरे यांनी स्वतःच्या जातीची हजारभर मतेही नसताना केवळ ‘खान विरुद्ध बाण’ या मुद्द्याचा प्रभावी वापर करून दिल्ली गाठण्यात चारदा यश मिळवले होते.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतीलच पण मराठा आंदोलनाचा प्रभावही या निवडणुकीवर राहील असा अंदाज आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमधील घाटावरील (पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा) व रायगडमधील (पनवेल, कर्जत, उरण) या घाटाखालील तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. शहरी, उद्योगनगरी, आयटी पार्क आणि शेती असा चार विभागांमध्ये हा मतदार संघ विभागला आहे. यामुळे प्रदूषण, वाहतूक कोंडी, गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांनी हा मतदारसंघ वेढलेला आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दुभंगलेल्या शिवसेनेचे दोन शिलेदार मावळ लोकसभा मतदार संघात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले अजित पवार समर्थक माजी महापौर संजोग वाघेरे लढत आहेत. यामुळे मावळमध्ये मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार याचीच चर्चा आहे. पाचवा टप्प्यामध्ये मतदान होणाऱ्या नाशिक मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची जरी पकड असली तरी अगदी शेवटच्या क्षणाला जाहीर झालेली उमेदवारी प्रचारासाठी मिळालेला कमी कालावधी, कांदा प्रश्न, मराठा आरक्षण आंदोलन याचाही फटका गोडसे यांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना सावधरितीनेच पावले टाकावी लागत आहेत. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजाभाऊ वाजे यांचे तगडे आव्हान गोडसे यांच्यासमोर आहे.

मुंबै कोणाची ?

शिवसेनेचा जन्म मुंबईतच झालेला असल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याणमधील मतदार नेमक्या कोणत्या शिवसेनेला मानणार, याची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे. मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण व दक्षिण मध्य या जागा शिवसेना लढवत आहे. त्याचबरोबर ठाणे व कल्याण याही जागा शिवसेना लढवत आहे. या पाच जागांवर थेट शिवसेनेची लढत शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आहे. त्यामुळे ही लढत शिंदेंना सोपी नाही.

कस का लागणार?

  • तोडफोडीच्या राजकारणामुळे मतदारांमध्ये नाराजी

  • शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहानुभूती असल्याने शिवसेनेसमोर तगडे आव्हान

  • भाजपसाठी सत्ता महत्वाची असल्याने शिंदेंच्या जागा कमी होणे परवडणारे नाही.

  • आर्थिक राजधानीवर पकड कोणाची हे स्पष्ठ होणार

  • लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे यांचा मतदार स्पष्ट होणार

  • राज्याच्या राजकारणातील शिंदे व ठाकरेंचे महत्वही ठरणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com