बुलेट ट्रेनसाठी पावणे दोन लाख कोटींचा खर्च

केंद्र व राज्य सरकारचे प्रकल्पावर एकमत; चार तासांत कापणार ७२० किलोमीटर अंतर
बुलेट ट्रेन
बुलेट ट्रेनSAKAL

मुंबई : केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वादाचे अनेक मुद्दे असताना मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबत दोन्ही सरकारचे एकमत झाले आहे. त्यानुसार मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी जवळपास दीड ते पावणेदोन लाख कोटींचा खर्च अपेक्षित असून बुलेट ट्रेन झाल्यास ७२० किलोमीटरचे अंतर अवघ्या चार तासांमध्ये कापले जाईल, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने दिली.

अनेक विकसित देशांमध्ये नागरी वाहतूक आणि उत्तम दळणवळणाच्या सुविधेसाठी बुलेट ट्रेन ही अत्यावश्यक मानली जाते. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाच्या उद्देशाने दिल्ली-अहमदाबाद, दिल्ली-अमृतसर, चेन्नई-बंगलोर आदी सात बुलेट ट्रेनच्या मार्गांची चाचपणी सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवरून राजकीय वाद सुरू असताना मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकमत झाले आहे. या बुलेट ट्रेनचा ८० टक्के भाग समृद्धी महामार्गाला समांतर असणार आहे. ‘समृद्धी’मुळे या भागातील बहुतांश भागाचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित २० टक्के भाग हा ठाणे ते घोटी परिसरातील असून तेथील पर्यावरणीय मंजुरीसाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असल्याचेही कॉर्पोरेशनने सांगितले.

या प्रकल्पासाठी राज्यांचे योगदान हे केवळ जमिनी देण्याचे असल्याने फारशी अडचण येणार नाही, असे कॉर्पोरेशनला वाटते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चीन, जपान आणि इस्राईलमधील कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. अर्थसाह्यासाठी जपानची ‘जायका’(जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) संस्थेची तयारी आहे. चीनने हायस्पीड रेल्वे उभारण्याच्या तंत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे; मात्र सद्यस्थितीत चीनचे सहकार्य घेण्याची भारताची मानसिकता नसल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ‘सिकॉन’ आणि ‘हेलिका जेव्ही’ या कंपनीमार्फत या मार्गाचे सर्वेक्षण काही महिन्यांपूर्वी करण्यात आले. त्यामुळे मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन लवकर सुरू व्हावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरू असून राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नोव्हेंबरमध्येच हे काम सुरू व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com