सध्या ‘काय ते दे द्या’चे राज्य ; भ्रष्टाचारावरून फडणवीस यांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis

सध्या ‘काय ते दे द्या’चे राज्य ; भ्रष्टाचारावरून फडणवीस यांची टीका

मुंबई : राज्याच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारची नोंद होणार असून आता या सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ‘सध्या कायद्याचे राज्य नसून काय ते दे द्या’ चे राज्य असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. भाजप कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, ‘सध्याचे सरकार हे वसुली करणाऱ्यांचे आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे. आज ज्या प्रकारे वसुली चालली आहे, ते पाहता या सरकारचा हात कोणीही धरणार नाही. या वसुलीपायी गृहमंत्री तुरूंगात आहेत. एवढ्यापुरते हे प्रकरण मर्यादित नाही. जसा एक वाझे आपण बघितला, तसा प्रत्येक विभागात एक वाझे आहे. आपल्याला कल्पना असेल गेल्या काही दिवसांत काही छापे पडले होते. आयकर विभागाने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केलेले आकडे धक्कादायक आहेत. कोठे हजार कोटीची दलाली तर कोठे पाचशे कोटींची अशी विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. ही वाटमारी चालली आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे, राज्यातील जनतेकडे मागे वळून पाहण्यास मात्र या सरकारला वेळ नाही."

राजकारणाचे गुन्हेगारीकरण का?

त्रिपुरातील दंगलीवरून राज्यात झालेल्या हिंसक घटनांचा फडणवीस यांनी उल्लेख केला. मतांसाठी केलेले हे पद्धतशीर कारस्थान असल्याचा टीका करताना त्यांनी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामूहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही.’

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

मोदींच्या अभिनंदनाचा ठराव

या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मोदीजींनी देशात परिवर्तनकारी बदल केले असून जनतेचा विश्वास हीच त्यांची पुंजी आहे, असे ते म्हणाले. यावेळी भाजपचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे चिरंजीव विजय शिवणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

फडणवीस म्हणाले...

  • आपले सरकार कधी येणार हा विचार सोडा

  • अमरावती, नांदेड, मालेगावातील हिंसाचार हा अल्पसंख्याकांच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग

  • संजय राऊतांची स्थिती "कोण होतास तू" अशी

  • राज्यातील सरकारचे अस्तित्व जाणवत नाही

  • २०२४ मध्ये बहुमताने सरकार आणायचे आहे

  • कोणी अंगावर धावून आल्यास सोडणार नाही

loading image
go to top