चित्रपटगृह मालकांमध्ये कभी खुशी कही गम; नवीन चित्रपट, SOPचा खर्च परवडणारा नाही

संतोष भिंगार्डे
Thursday, 12 November 2020

काही चित्रपटगृहे दिवाळीनंतर उघडण्याच्या बेतात आहे. त्यातच सरकारची नवीन नियमावली आणि मुंबई पालिका प्रत्येक शोमागे अधिक कर आकारणार असल्यामुळे चित्रपटगृह मालक तसेच वितरक आणि निर्माते यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

मुंबईः  सरकारने ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी काही ठिकाणची चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. काही चित्रपटगृहे उद्या तसेच शुक्रवारपासून सुरू होणार होताहेत. तर काही चित्रपटगृहे दिवाळीनंतर उघडण्याच्या बेतात आहे. त्यातच सरकारची नवीन नियमावली आणि मुंबई पालिका प्रत्येक शोमागे अधिक कर आकारणार असल्यामुळे चित्रपटगृह मालक तसेच वितरक आणि निर्माते यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सरकारची एसओपी पाहता एकूणच होणारा खर्च चित्रपटगृह मालिकांना परवडणारा नाही आणि त्यातच नवीन धमाकेदार चित्रपटदेखील नाही. त्यामुळे काही चित्रपटगृहे आता उघडणार असली तरी काही दिवाळीनंतरच उघडतील. त्यातच आता मुंबई पालिकेने प्रत्येक शोमागे अधिक कर आकारणार असल्यामुळे आधीच मोडकळीस आलेला हा व्यवसाय आणखीन कोलमडणार आहे.

अधिक वाचा-  दिवाळी बोनस द्या नाहीतर संपावर जातो; राज्यातील वीज कामगारांचा संतप्त इशारा

मालाडच्या कस्तुरबा चित्रपटगृहाचे मालक निमेश सोमय्या म्हणाले, की सरकारची एसओपी खूप त्रासदायक आहे. त्यानुसार काम केल्यास होणारा खर्च आम्हाला परवडणारा नाही. त्यातच पालिकेने शोचा कर वाढविला आहे. पहिल्यांदा वीस रुपये, नंतर साठ रुपये आणि आता वातानुकूलित चित्रपटगृहाला 200 रुपये कर आकारणार आहे. नुकत्याच झालेल्या एका वेबिनारमध्ये सरकारने संगितले की आम्ही आता कर आकारणार नाही आणि आता हा कर आकारत आहेत. आता हा व्यवसाय चालवायचा कसा असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. त्यातच आता चांगला चित्रपटदेखील नाही. त्यामुळे आम्ही चित्रपटगृह दिवाळीनंतर सुरू करणार आहोत.

अधिक वाचा-  नितीशकुमारांची वरात काढून त्यात घोडे नाचवले जातील, सामनातून भाजपवर टीका

पीव्हीआर, मिराज, कार्निव्हल अशी काही मल्टिप्लेक्स उद्या किंवा शुक्रवारी उघडणार आहेत. एकेका मल्टिप्लेक्समध्ये पाच किंवा सहा स्क्रीन असली तरी त्यातील दोन किंवा तीनच सुरू होणार आहेत.  सिनेमा ओनर्स अॅण्ड एक्झीबीटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले, की सरकारची नवीन एसओपी आहे त्यामध्ये काही तरी सूट मिळावी. तसेच चांगला बंपर व्यवसाय करील असा चित्रपटही नाही. त्यामुळे बहुतेक सिंगल स्क्रीन दिवाळीनंतरच उघडतील.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Theater start from Friday Theater owners cannot afford SOP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theater start from Friday Theater owners cannot afford SOP