मेट्रोमुळे झाकोळले ठाण्यातील 'थीम पार्क' 

दीपक शेलार
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून मोठ्या हौसेने उभारलेला "जुने ठाणे-नवे ठाणे' हा थीम पार्क प्रकल्प कोनाड्यात पडला आहे. पर्यटकांना या थीम पार्ककडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची मेट्रोच्या कामामुळे दुर्दशा झाली असून उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्‌समुळे येथे थीम पार्क असल्याचेच दिसत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पालिकेने उभारलेल्या या प्रकल्पाचे ठाणेकरांना किंबहुना या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना दर्शन दुर्लभ बनले आहे. 

ठाणे : ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून मोठ्या हौसेने उभारलेला "जुने ठाणे-नवे ठाणे' हा थीम पार्क प्रकल्प कोनाड्यात पडला आहे. पर्यटकांना या थीम पार्ककडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची मेट्रोच्या कामामुळे दुर्दशा झाली असून उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्‌समुळे येथे थीम पार्क असल्याचेच दिसत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पालिकेने उभारलेल्या या प्रकल्पाचे ठाणेकरांना किंबहुना या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना दर्शन दुर्लभ बनले आहे. 

थीम पार्क प्रकल्पात ठाण्यातील कोपिनेश्‍वर मंदिर, मासुंदा तलाव, ठाण्याचे ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृह, मासुंदा तलावावरील शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, गडकरी रंगायतन, ठाणे स्थानकावरून मुंबई ते ठाणे धावलेली पहिली रेल्वे, जुने ठाणे बंदर, गणपती विसर्जन थीम, जुने ठाणे आरमार यांना उजाळा देणाऱ्या प्रतिकृती निर्माण केल्या आहेत.

एमआरआयडीसी बांधणार 10 पूल 

सद्यस्थितीत या प्रतिकृतींकडे लक्ष देण्यास पालिका प्रशासनाला वेळ नसला तरी पालिकेने या ठिकाणी सुरक्षारक्षक मात्र नेमले आहेत. सकाळी व सायंकाळी आठ वाजेपर्यंत हा थीम पार्क प्रेक्षकांसाठी खुले ठेवण्यात येत असून सध्या इथे तुरळक प्रमाणात प्रेक्षक आणि प्रेमीयुगुलांचा वावर असतो. 

घोडबंदर रोडवर सध्या मेट्रोचे काम जोरात सुरू असल्याने थीम पार्कजवळील सर्व्हिस रोड पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे वाहने नेण्यास अडथळे निर्माण होऊन नागरिकांना थीम पार्ककडे आडवाटेने पायपीट करीत जावे लागते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पाची देखभाल आणि येथे जाण्यासाठी पुरेशी दळणवळण सुविधा पुरवण्याकडे पालिकेने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही?

ऐतिहासिक ठाण्याचे कळते महत्त्व 
घोडबंदर परिसरात राहावयास येणाऱ्या नव्या ठाणेकरांना, तसेच नवीन पिढीला जुन्या ऐतिहासिक ठाण्याचे महत्त्व कळावे यासाठी ठाणे महापालिकेने थीम पार्कच्या माध्यमातून स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या सहकार्याने "जुने ठाणे-नवे ठाणे' हे थीम पार्क उभारले. या थीम पार्कमध्ये ठाणे शहराची असलेली ऐतिहासिक माहिती थोरामोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वांना मिळणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Theme park' in Thane covered by metro