लोकलमधून प्रवास करणार्‍या मुंबईकरांच्‍या जीवाची काही किंमत आहे की नाही...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

लोकलमधून तिघे पडले; एकाचा मृत्यू मुंब्रा-कळवादरम्यान घडली घटना 

ठाणे/कळवा  ः मुंब्रयाहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणारे तीन प्रवासी गाडीतून पडले. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.5) घडली. सकाळी नऊ वाजून 28 मिनिटांच्या लोकलमध्ये हे तिघेजण प्रवास करत होते. 10 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा ते कळवादरम्यान खारीगाव रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली. या घटनेत हाजी रईस अहमद (53, रा. मुंब्रा, मूळ उत्तर प्रदेश, बरेली) या प्रवाशाचा मृत्यू झाला; तर इम्तियाज गुलाम हैदर शेख (42) आणि अबू ओसामा (23), दोघेही रा. अमृतनगर, कौसा, मुंब्रा हे जखमी झाले आहेत.

महत्‍वाचे...गडकिल्‍ल्‍यांवर दारू पिणार्‍यांवर कठोर कारवाई करा

सकाळच्या सत्रात मुंब्रा रेल्वेस्थानकावरून प्रचंड गर्दीत मुंबईकरता लोकल ट्रेन पकडणे म्हणजे मोठे दिव्य असते. बुधवारीदेखील लोकलला तुडुंब गर्दी असल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करीत होते. या गर्दीमुळे तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघे जण लोकलमधून पडल्याच्या घटना मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान घडल्या.

या घटनेतंर या तिघांनाही तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने हाजी रईस अहमद याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर इम्तियाज शेख याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून अबू ओसामा याच्यादेखील डोक्‍याला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. मृत्यू झालेले हाजी अहमद हे मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईला आले होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनांची नोंद ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

महत्‍वाचे...मलबार येथे इमारतीला भीषण आग

दरवर्षी तीन हजार बळी 
लोकलमधून पडून दरवर्षी जवळपास तीन हजार लोक मृत्युमुखी पडतात. लोकलमधील गर्दीमुळे अनेक जण जायबंदी होतात. दोन महिन्यांपूर्वीच चार्मी पासद या तरुणीचा; तसेच अजय निकाते या तरुणाचा डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान गर्दीमुळे तोल जाऊन मृत्यू झाला होता. याशिवाय नावेद शेख, इमरान शेख, प्रदीप प्रजापती आणि शाईजा परवेज सिद्दीकी हे मुंब्रा ते कळवादरम्यान प्रवास करताना याआधी जखमी झाले. तेव्हा, लोकलच्या फेऱ्यासह डबे वाढवणे; तसेच वर्दळीच्या कालावधीत मेल-एक्‍स्प्रेसमधून लोकलच्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली पाहिजे, आदी मागण्या रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. 

दरवर्षी जवळपास तीन हजार प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडतात. आज पुन्हा एकदा एका प्रवाशाचा जीव गेला आहे. मृत्यू कमी व्हायचे असतील तर रेल्वे प्रशासनाने या समस्या सोडवण्यासाठी गंभीर होणे गरजेचे आहे. 
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष रेल्वे प्रवासी संघटना, ठाणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The trio fell from the locale; The death of one