...तर एक रुपयाही शुल्क परत मिळणार नाही;  विद्यार्थ्यांची पदवी अभ्यासक्रमांकडे धाव : प्रवेश रद्द केल्यास पैसे मिळण्याची शक्‍यता धुसर 

तेजस वाघमारे 
Tuesday, 11 August 2020

भविष्यात प्रवेश रद्द केल्यावर त्यांना पूर्ण शुल्क परतावा मिळणार नाही. यामुळे विद्यार्थी चांगलेच कात्रीत सापडले आहेत. महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या प्रवेश रद्द करण्याचा नियमांचे पालन केल्यास 30 सप्टेंबरनंतर विद्यार्थांना एकही रुपया परत मिळणार नाही.

मुंबई :  इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षेबाबत यंदा मोठ्या प्रमाणावर प्रवेश गोंधळ पाहवयास मिळत आहे. विज्ञान शाखेचे विद्यार्थी बीएसस्सीला प्रवेश घेऊन ठेवतील. मात्र त्यांनी भविष्यात प्रवेश रद्द केल्यावर त्यांना पूर्ण शुल्क परतावा मिळणार नाही. यामुळे विद्यार्थी चांगलेच कात्रीत सापडले आहेत. महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या प्रवेश रद्द करण्याचा नियमांचे पालन केल्यास 30 सप्टेंबरनंतर विद्यार्थांना एकही रुपया परत मिळणार नाही.

शाळांच्या भरमसाठ फी आकारणीविरोधात पालक थेट न्यायालयात; वाचा संपुर्ण प्रकरण

इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीय प्रवेशाच्या सीईटी परीक्षांवर यंदा कोरोनाचे सावट आहे. नीटचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी सीईटी परीक्षांच्या तारखा अद्यापही निश्‍चित झालेल्या नाहीत. पाल्याला सीईटीनंतर इंजिनीअरिंग, मेडिकलला प्रवेश मिळेल की नाही याची धास्ती पालकांना वाटत असते. प्रवेशाच्या या अनिश्‍चितेततेमुळे पालक पाल्याचा प्रवेश पारंपारिक विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमांलाही घेउन ठेवतात. इंजिनिअरिंग, मेडिकलला प्रवेश मिळाल्यानंतर पुन्हा महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्यात येतो. प्रवेश रद्द केल्यास महाविद्यालय विद्यार्थ्यांचे शुल्क कपात करून देतात. यंदा सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द केल्यास शुल्काची रक्कम परत मिळण्याची शक्‍यता धूसर आहे. 

राज्य सरकारने दिव्यांगाना दरमहा 5000 रूपयांची मदत द्यावी;  निर्धार विकलांग विकास सामाजीक संघाची मागणी

यंदा कोरोनामुळे विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. मेडिकल अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक ठरलेले नाही. यातच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकृषी विद्यापीठांनी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल की नाही याची धास्ती असणारे पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश महाविद्यालयांमध्येही करून ठेवतात. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी चांगले महाविद्यालय आणि शाखा मिळाल्यास विद्यार्थी अकृषी विद्यापीठातील प्रवेश रद्द करतात. महाविद्यालयांच्या प्रवेश रद्द करण्याच्या नियमांनुसार कपात होते. परिणामी विद्यार्थ्यांनी  सप्टेंबरनंतर प्रवेश रद्द केल्यास त्याला शुल्कातील एकही रुपयाचा परतावा मिळणार नाही. यामुळे शुल्क परताव्याबाबत सरकारने लक्ष घालावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

बनावट कागदपत्रांद्वारे बॅंकेची कोट्यवधीची फसवणूक; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

जागा रिक्त राहण्याची भीती
चांगले गुण मिळालेले विद्यार्थी सध्या नामांकित महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेत आहेत. मात्र एकदा इंजिनीअरिंग महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा हे विद्यार्थी या महाविद्यालयांतील प्रवेश रद्द करतील. त्यावेळेस नियमित महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असेल यामुळे जागा रिक्त राहण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

 

कोरोना संकटाचा शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला आहे. महाविद्यालयांनी प्रवेश रद्द करण्याच्या विद्यापीठाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. परंतु यंदा कोरोनामुळे पालकही आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यंदा प्रवेश रद्द केल्यास शुल्काची अधिक रक्कम देण्याची सहानुभूती महाविद्यालयांनी दाखवावी.
- वैभव नरवडे - व्यवस्थापन परिषद सदस्य,  मुंबई विद्यापीठ

 

... अशी होते शुल्क कपात
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थांना प्रवेश रद्द केल्यास त्याच्या शुल्कातून रक्कम कपात करण्याबाबत विद्यापीठाने 2008 मध्ये परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी विद्यार्थाने प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थांने भरलेल्या ऐकून प्रवेश शुल्कातून 500 रुपये कपात होऊन उर्वरित रक्कम विद्यार्थांस दिली जाते. तसेच महाविद्यालय सुरू होऊन 20 दिवस झाल्यानंतर एकूण शुल्कातून 20 टक्के, 21 ते 50 दिवस झाल्यानंतर 30 टक्के, 51 ते 80 दिवसानंतर 50 टक्के, 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीनंतर 60 टक्के आणि 30 सप्टेंबरनंतर 100 टक्के शुल्क कपात केली जाते.

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... then not a single rupee will be refunded; Students rush to degree courses: Possibility of getting money if admission is canceled